राहुरीच्या पीआय दुधाळ यांच्याविरोधात शुक्रवारी आक्रोश मोर्चा

दलित कुटुंबावर अत्याचार करणार्‍या नेत्याला पाठीशी घातल्याचा आरोप
राहुरीच्या पीआय दुधाळ यांच्याविरोधात शुक्रवारी आक्रोश मोर्चा

उंबरे |वार्ताहर| Umbare

राहुरी तालुक्यातील खडांबे येथे दलित कुटुंबियावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व आरोपींना पाठीशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यास निलंबित करावे, या मागणीसाठी शुक्रवार दि.25 जून रोजी राहुरी पोलीस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

निवेदनात म्हटले, तालुक्यातील खडांबे गावातील बाळासाहेब लटके या राजकीय पुढार्‍याकडून दलित कुटुंबावर अमानुषपणे अत्याचार झालेला आहे.

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रत्यक्षात या कुटुंबाला भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तिथे गेल्यावर कुटुंबातील व्यक्तींनी घडलेली घटना कार्यकर्त्यांना सांगितली. लटके हे राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य आहेत. गावातील खाणीतून अमोल साळवे व त्याची काकू यांनी त्यांच्या घरच्या गाया पाणी पाजून आणल्या. ही गोष्ट लटके व त्यांच्या घरातील लोकांना समजल्यामुळे त्यांनी त्या दिवशी दुपारी येऊन आंतवन साळवे, अमोल साळवे व त्यांच्या दोन बहिणी त्यामधे एक मतिमंद आहे. त्यांना जबर मारहाण केली. या मारहाणीमध्ये साळवे यांच्या घरातील दोन मुलींना मारहाण झाली आहे. त्यामधील एक मुलगी ही अतिशय बिकट परिस्थितीमध्ये आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडलेली असताना देखील राहुरीचे पोलीस यांनी या घटनेकडे राजकीय पुढार्‍याच्या दबावापोटी कानाडोळा करून आरोपींना पाठीशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आंतवन साळवे, त्यांची भावजई व लटके यांना राहुरीच्या पोलिसांनी पोलीस स्टेशनला बोलावले असता राहुरीचे पी.आय.नंदुकमार दुधाळ यांनी साळवे या सेवानिवृत पोलीस अधिकार्‍याला अपमानीत करून उलट त्यांच्यावरच खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला व त्यांच्यासमोर राहुरीचे पीआय दुधाळ यांनी सांगितले, तुमच्यावर जर अ‍ॅट्रासिटी दाखल केली तर तुम्ही देखील त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करा, अशी माहिती आंतवन साळवे, अमोल साळवे व त्याच्या बहिणींनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. पंधरा दिवस होऊन देखील राहुरीच्या पी.आय.ने अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला नाही.

आता लटके व त्यांच्या कुटुंबातील मारहाण करणार्‍या लोकांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन त्यांना तात्काळ अटक करण्यात येत नाही व आरोपींना पाठीशी घालून कर्तव्यात कसूर केली म्हणून राहुरीचे पीआय दुधाळ यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना निलंबित केले जात नाही, तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही व येत्या 25 तारखेला राहुरीचे पीआय दुधाळ यांच्यावर कारवाई होण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल जाधव, पिंटू नाना साळवे, बाबुराव मकासरे, रवींद्र गायकवाड, गोरख थोरात आदींनी दिली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com