
अहमदनगर | सचिन दसपुते| Ahmednagar
एटीएम मशीन फोडून त्यातील रक्कम लांबविणार्या घटना जिल्ह्यात वाढल्या आहेत. गेल्या वर्षभरात चोरट्यांच्या टोळ्यांनी 21 एटीएम मशीन फोडले. यातील सात एटीएम मशीनमधून 31 लाख 20 हजारांची रक्कम लांबविली. तर 14 ठिकाणच्या एटीएममधून चोरट्यांना रक्कम काढता आली नाही. एटीएम फोडीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर आतापर्यंत फक्त पाच गुन्ह्यांचा तपास लावण्यात पोलिसांना यश आले आहे. तर दुसरीकडे बँकांकडून एटीएम मशीन सुरक्षेची काळजी घेतली जात नसल्याचे दिसून येत आहे. यामुळे जिल्ह्यात एटीएम मशीन फोडीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
एटीएम मशीन फोडणार्या तीन प्रकारच्या टोळ्या जिल्ह्यात सक्रीय आहेत. यामध्ये गॅस कटर, जिलेटीनचा स्फोट उडवून तसेच एटीएम मशीन वाहनाला बांधून ओढून नेणार्या टोळ्यांचा समावेश आहे. गेल्या वर्षभरात जिल्ह्यातील लोणी, संगमनेर शहर, संगमनेर तालुका, पारनेर, कोतवाली, नगर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील सात एटीएम मशीन फोडून त्यातील 31 लाख 20 हजार रुपयांची रक्कम चोरून नेली आहे. त्यातील फक्त पारनेर पोलीस ठाणे हद्दीत घडलेल्या गुन्ह्याचा तपास करण्यात स्थानिक गुन्हे शाखा, पारनेर पोलिसांना यश आले आहे. इतर सहा ठिकाणच्या एटीएम फोडणार्या टोळ्या पोलिसांना सापडलेल्या नाहीत. 14 ठिकाणी एटीएम फोडीचा प्रयत्न झाला. यातील चार गुन्ह्यांचा तपास करण्यात पोलिसांना यश आले आहे. प्रयत्न करणार्या 10 गुन्ह्यांचा तपास अद्याप लागलेला नाही.
गेल्या वर्षभरात एटीएम फोडीच्या घटना वारंवार होत असतानाही बँकांनी एटीएम सुरक्षेची काळजी घेतली नसल्याचे दिसून येत आहे. वास्तविक पाहता एटीएममशीनच्या ठिकाणी सुरक्षा रक्षकाची नियुक्ती करणे, एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज थेट बँकेच्या मुख्यालयात डीव्हीआर मध्ये स्टोरेज करणे, छेडछाड झाल्यास आलाराम सिस्टीम कार्यान्वित करणे, सुरक्षा रक्षक नियुक्तीस विलंब होत असल्यास रात्रीच्या वेळी एटीएममध्ये रोकड न ठेवणे, एटीएम मशीन कायमस्वरूपी मजबूत इमारतीमध्ये बसविण्याचे काम बँकांनी करणे आवश्यक आहे. काही बँकांकडूनच याची अंमलबजावणी होत आहे. इतर बँकांच्या एटीएम मशीनची सुरक्षा सध्यातरी रामभरोसे असल्याचे दिसून येत आहे.
हरियाणा, मध्यप्रदेशमधील टोळ्या
जिल्ह्यात एटीएम मशीन फोडणार्या टोळ्या हरीयाणा, मध्यप्रदेश राज्यातील आहे. जिल्ह्यातील एटीएम मशीन फोडून या टोळ्या पसार होतात, त्यांच्यापर्यंत पोहचणे पोलिसांना लवकर शक्य होत नसल्याचे पोलिसांनी सांगितले. गॅस कटरच्या सहाय्याने एटीएम मशीन फोडणार्या टोळ्या हरीयाणा तर जिलेटींगच्या स्फोट उडवून एटीएममधील रक्कम चोरणारी टोळ्या मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. वाहनांना एटीएम मशीन बांधून ते ओढणारी टोळ्या स्थानिक असल्याचे पोलिसांनी सांगितले.
बँकांची उदासीनता
जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी नुकतीच जिल्ह्यातील एटीएम बँक प्रतिनिधींची बैठक घेतली. या बैठकीमध्ये बँक प्रतिनिधींना एटीएम मशीन सुरक्षेच्या उपाय योजना सुचविल्या आहेत. ती जबाबदारी बँकेची असल्याचे लक्षात आणून दिले आहे. पोलिसांनी सर्व बँक प्रतिनिधींना भादंवि कलम 149 नुसार नोटिसा बजावल्या आहेत. बर्याचशा बँका ह्या एटीएम सुरक्षेबाबत भारतीय रिझर्व बँकेच्या ठरवून दिलेल्या नियामांचे योग्य रितीने पालन करीत नसल्याने एटीएम चोरीच्या घटना घडल्याचे दिसून आलेले आहेत, अशी भूमीका जिल्हा पोलिसांनी बँक प्रतिनिधींसमोर विषद केली. तसेच भादंवि कलम 149 नुसार नोटिसा दिल्या आहेत. संभवनिय अपराध होण्याची जाणीव असतानाही उपाय योजना केली नाही. त्यानंतर घडलेल्या घटनेस संबंधिताला दोषी धरण्याबाबतची ही नोटिस आहे.