एटीएम कार्डची अदलाबदल करून सव्वाचार लाख काढले

तिघांकडून वृध्दाची फसवणूक || तोफखाना पोलिसांत गुन्हा
File Photo
File Photo

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एटीएम कार्डची अदलाबदल करून एका वृध्दाच्या बँक खात्यातून चार लाख 23 हजार रूपये काढून घेत फसवणुक केली. मंगळवारी दुपारी सावेडी उपनगरात ही घटना घडली. फसवणुक झालेल्या वृध्दाने तत्काळ तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दिलेल्या फिर्यादीवरून अनोळखी तिघांविरूध्द फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नंदकुमार राधेय जगताप (वय 68 रा. पंचवटी कॉलनी, पाईपलाइन रोड, सावेडी) असे फसवणुक झालेल्या वृध्द व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी पोलिसांत फिर्याद दिली आहे. ते न्यु आर्ट्स कॉलेजमधून सेवानिवृत्त झाले आहे. ते मंगळवार, 10 जानेवारी, 2023 रोजी दुपारी त्यांच्या अ‍ॅक्सेस बँक, सावेडी रोड शाखेचे एटीएम (डेबिट) कार्ड घेऊन सर्जेपुरा येथील एसबीआय बँकेच्या एटीएम मशीनमध्ये गेले होते. तेथे त्यांनी अ‍ॅक्सेस बँकच्या एटीएम कार्डवरून दोन हजार रूपये काढुन घेतले. फिर्यादी पैसे काढत असताना त्यांच्या पाठीमागुन तीन अनोळखी इसम आले आणि ते हिंदी भाषेमध्ये बोलत होते.

ते सर्वजण एकाच वेळी फिर्यादीला म्हणाले,‘तुमचे ट्रांजेक्शन बरोबर झालेले नाही, त्यामुळे आम्हाला पैसे काढता येत नाहीत. तुम्ही परत तुमचे एटीएम कार्ड मशीनमध्ये टाका नंतरच तुमचे अगोदरचे ट्रांजेक्शन रद्द होईल’, असे सांगितल्याने फिर्यादी यांनी परत त्यांचे कार्ड मशीनमध्ये टाकले. पैसे विड्रोल होण्याची प्रक्रीया पुन्हा चालु झाली. त्यावेळी एटीएम मशीनमध्ये काही बटने त्या तीन अनोळखी इसमा पैकी एकाने दाबली. त्यावेळी एटीएममधुन 500 रूपये फिर्यादी यांनी काढुन घेतले.त्यानंतर ते अनोळखी इसम फिर्यादी यांना म्हणाले,‘तुमचे ट्रांजेक्शन पूर्ण झालेले नाही.

तुम्ही तुमचे एटीएम कार्ड एटीएम मशीनमध्ये दोन तीन वेळा टाका,’ असे सांगितले. त्या दरम्यान तीन अनोळखी इसमांनी फिर्यादी यांच्या एटीएम कार्डची हातचलाखीने अदलाबदल करून त्यांना दुसरे एटीएम देऊन ते इसम निघुन गेले. त्यानंतर दुपारी 2:28 वाजता फिर्यादीला मेसेज आला. एक लाख रूपये ऑनलाईन ट्रांजेक्शन झाल्याचा तो मेसेज होता. तेव्हा फिर्यादीच्या लक्षात आले की, त्यांची फसवणुक झाली आहे.

त्यावेळी पुन्हा अ‍ॅक्सेस बँक एटीएममधुन खात्यातुन 20 हजाराचे प्रत्येकी चार ट्रांजेक्शन, 30 हजार रूपयाचे एक ट्रांजेक्शन तसेच 13 हजार रूपयांचे एक ट्रांजेक्शन झाल्याचे मेसेज आले. असे एकुण चार लाख 23 हजार रूपये खात्यातून काढुन घेत फिर्यादीची फसवणुक केली आहे. दरम्यान फसवणुक झाल्याचे फिर्यादी यांच्या लक्ष्यात येताच त्यांनी अ‍ॅक्सेस बँकेच्या सावेडी रोड शाखेत संपर्क साधून त्यांच्या खात्यावरील सर्व ट्रांजेक्शन बंद करण्यास सांगितले व नंतर तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अधिक तपास पोलीस करीत आहेत.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com