अटलबिहारी वाजपेयी आयलँड प्रकरणी नगरपरिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी

अन्यथा नगरपरिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन - छल्लारे
अटलबिहारी वाजपेयी आयलँड प्रकरणी नगरपरिषदेचे अधिकारी व पदाधिकारी यांच्यावर कारवाई करावी

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

श्रीरामपूर नगरपरिषदेने केलेल्या माजी पंतप्रधान भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आयलँडच्या कामात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करू पाहणार्‍या श्रीरामपूर नगरपरिषदेच्या अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर 3 ते 5 नोव्हेंबर 2022 अखेर कारवाई करावी, अन्यथा नगरपरिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काँग्रेसचे शहराध्य़क्ष तथा माजी उपनगराध्य़क्ष संजय छल्लारे यांनी दिला आहे.

याबाबत जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनात छल्लारे यांनी म्हटले आहे की, श्रीरामपूर नगरपरिषदेने भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी आयलँडच्या कामासंदर्भात अनियमीतरित्या निविदा प्रक्रिया राबविली. या कामाची लाखो रुपयांची बोगस बिले काढण्याच्या उद्देशाने नगरपरिषदेच्या अधिकारी, पदाधिकारी यांनी संगनमत करुन झालेल्या कामाची निविदा प्रक्रिया राबविली. यासंदर्भात आपण आपल्या कार्यालयाकडे रितसर तक्रार अर्ज केला होता. त्या अनुषंगाने आपल्या कार्यालयाने सदर कामाची सखोल चौकशी करण्यासाठी नेवासा नगरपंचायतीचे स्थापत्य अभियंता प्रविण कदम (अध्यक्ष) आणि नेवासा नगरपंचायतीचे लेखापाल भाऊसाहेब म्हसे (सदस्य) अशी 2 सदस्यीय चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.

सदर चौकशी समितीला 7 दिवसांत चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. सदरचे आदेश देऊन जवळपास 3 महिन्यांचा कालावधी उलटूनही अद्यापपावेतो कुठलीही कार्यवाही झालेली नाही. ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. सदर प्रकरणी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार करु पाहणार्‍या नगरपरिषदेच्या अधिकारी, पदाधिकारी यांच्यावर 3 ते 5 नोव्हेंबर 2022 अखेर कारवाई करावी, अन्यथा नगरपरिषदेसमोर ढोल बजाव आंदोलन करण्यात येईल, एवढे करुनही आपले कार्यालयाने कुठलीच दखल न घेतल्यास कोणतीही पुर्व सुचना न देता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल, असा इशारा माजी उपनगराध्य़क्ष छल्लारे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.

निवेदनाच्या प्रती पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नगर विकास मंत्रालयाचे प्रधान सचिव, नाशिक विभागीय आयुक्त, प्रांताधिकारी व मुख्याधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com