अनाथ बालकांच्या घरी पोलिसांनी भेटी द्याव्यात

जिल्हाधिकार्‍यांच्या सूचना: जिल्हास्तर कृती दलाची आढावा बैठक
अनाथ बालकांच्या घरी पोलिसांनी भेटी द्याव्यात

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

बालकांचे शोषण होणार नाही व ते तस्करीसारख्या गंभीर गुन्हेगारीमध्ये सापडणार नाही, याची दक्षता पोलिसांनी घ्यावी.तसेच जिल्ह्यातील अनाथ बालकांच्या घरी प्रत्येक तालुक्याच्या पोलीस निरीक्षकांनी भेटी देऊन बालकनिहाय भेटीचा अहवाल सादर करण्याची सूचना जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरावरील कृती दलाची बैठक आयोजित करण्यात आली होती. बालकांची काळजी व संरक्षणासाठी जिल्हास्तरावर कृती दलाची स्थापना करण्यात आली आहे. बैठकीस अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. एन. दहिफळे, महानगरपिालकेच्या आरोग्य विभागाचे डॉ. सतिष राजूरकर, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. सचिन सोलाट आदी उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले म्हणाले, पोलीस विभागाने करोना महामारीमुळे आई व वडील मृत पावलेल्या जिल्ह्यातील सध्यस्थितीतील 24 बालकांना शासन निर्णयानुसार सर्वोतोपरी संरक्षण तसेच सदर बालके शोषणास बळी पडणार नाही याची सर्व संबधितांनी काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.

सद्यस्थितीत जिल्ह्यात करोनामुळे एक हजार 223 बालकांची माहिती प्राप्त झालेली असल्याचे तसेच त्यापैकी दोन्ही पालक गमावलेली एकूण 24 बालके असून एक पालक गमावलेली एकूण एक हजार 199 बालकांची माहिती प्राप्त झाली असल्याचे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालयाचे जिल्हा समन्वयक वैभव देशमुख यांनी दिली.

न्यायिक सल्ल्यासाठी वकिलाचे पॅनल

जिल्हा विधिसेवा प्राधिकरणातर्फे करोनामुळे आई व वडील मृत पावलेल्या बालकांना कायदेशीर हक्क मिळवून देण्याबाबत न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करून देणे, बालकांचे आर्थिक व मालमत्ता विषयक हक्क अबाधित राहतील याचीही दक्षता घेण्याबाबतचा अहवाल सादर करण्याबाबात मागील बैठकीत निर्देश देण्यात आले होते. त्यानुसार सदर कामकाजासाठी वकिलांचे एक पॅनल तयार करण्यात आले असून या पॅनलच्या मदतीने बालकांना न्यायिक सल्ला व इतर सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येत असल्याची माहिती जिल्हा विधिसेवा प्राधिकरणकडून देण्यात आली.

विधवांसाठी बचतगटांची मदत

करोनामुळे अनाथ झालेल्या बालकांना तात्पुरत्या स्वरूपात पिवळी शिधा पत्रिका वाटप करण्यात आल्याची माहिती जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी दिली. विधवा झालेल्या पात्र महिलांना संजय गांधी निराधार योजनेचा लाभ देण्यात यावा, अशी सूचना जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी बैठकीत केली. विधवा महिलांचे बचतगट स्थापन करून बचत गटामार्फत राबविण्यात येणार्‍या योजनांचा प्राधान्याने लाभ देण्याबाबत तसेच या बचत गटांना जिल्हा आर्थिक विकास महामंडळ या विभागामार्फत कमी व्याजदरात भाग भांडवल उपलब्ध करून देण्याचीही सूचना बैठकीत करण्यात आली. बैठकीत दिलेल्या निर्देशांच्या अंमलबजावणीचा अहवाल पुढील बैठकीत सादर करण्याचे आदेशित करण्यात आले.

Related Stories

No stories found.