अस्तगावच्या रोपवाटिका गर्दीने फुलल्या !

अस्तगावच्या रोपवाटिका गर्दीने फुलल्या !

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

अस्तगाव भागातील रोपवाटिका ग्राहकांनी फुलु लागल्या आहेत. लॉकडाउन नंतर या रोपवाटिकामधील रोपांना चांगली मागणी आहे. अस्तगावच्या मातीत फुललेल्या गुलाबाचा सुगंध आता सर्वदुर पसरला आहे. शेकडो एकरात उभी असलेली फुलशेतीमुळे नर्सरी व्यवसाय हाच या परिसरातील विकासाचा कणा ठरला आहे. फुलांपासुन फळांपर्यंत सर्वच रोपे करण्याची कला येथील तरुणांना अवगत झाली आहे. नर्सरी उद्योगामुळे तालुक्यातच नव्हे तर इतरत्रही गावाने आपले वेगळेपण जपले आहे!

येथील गुलाबाची फुले मुंबई, तसेच परराज्यात यापुर्वी निर्यात झाली आहेत. जवळच शिर्डी सारखे आंतराष्ट्रीय तिर्थक्षेत्र आहे. आणि हीच आता या गुलाबांच्या फुलांची मुख्य बाजारपेठ बनली आहे. शिर्डीच्या रुपाने गुलाबाच्या फुलांना किंबहुना फुलांच्या विक्रीला मोठा वाव आहे. अस्तगाव बरोबरच गणेशनगर येथेही गुलाब डोलु लागले आहेत. गुलाबशेती हे अनेक कुटुंबांचे उपजिविकेचे साधन बनले आहे.

अस्तगाव येथील प्रसिध्द फुलशेती तज्ञ दिवंगत विलासशेट डुंगरवाल यांनी 30-35 वर्षांपुर्वी या व्यावसायाची मुहर्तमेढ रोवली. त्याकाळी नगरला गुलाबाचे प्रदर्शन भरले होते. कै. डुंगरवाल त्या ठिकाणी प्रदर्शन पाहाण्यासठी गेले. प्रदर्शनातुन त्यांनी 25 गुलाबाची रोपे खरेदी केले. व ती आपल्या शेतात लावली. पुढे या रोपांना फुले आली. सहज म्हणुन ती विकली गेली. त्यातुन त्यांच्यातील व्यापारी जागा झाला. पारंपारिक पिकाला छेद देत त्यांनी व्यापक स्वरुपात गुलाबाची शेती करण्याचा सकल्प केला. आणि तो साकारलाही. कै. डुंगरवाल, दिवंगत राजाराम टिळेकर यांनी या भागात फुलशेेेतीचा पाया घातला. शिर्डी जवळ असल्याने चांगल्या प्रकारची बाजारपेठ उपलब्ध झाली. फुलांची मागणी वाढली. फुलशेतीत चांगले उत्पन्न निघते. यांची कल्पना आजुबाजुच्या शेतकर्‍यांना आली आणि त्यांनी कै. डुंगरवाल यांचे अनुकरण केले.

फुलांच्या विक्रीबरोबरच आपल्या नर्सरीत रोपे बनली, जावीत म्हणुन त्यांनी तसे प्रयत्न केले. डोळे भरणे (आय बडींग) पध्दतीने गुलाबाचे कलम करण्यास प्रारंभ केला आणि रोपांची विक्रीही सुरु केली. त्यात त्यामुळे जिल्ह्यातुन, जिल्ह्याबाहेरुन रोपांना मागणी वाढु लागली. थेट परराज्यातही रोपे विक्रीस जावु लागली. परप्रांतीय भाविक शिर्डीला आल्यानंतर कै. डुंगरवाल यांचे नर्सरीत भेट देवु लागले. आजुबाजुच्या शेतकर्‍यांच्या शेतातही रंगीबेरंगी गुलाब डोलु लागले. आणि अस्तगावला गुलाबाचे माहेरपण आले.

फुलशेतीमुळे मजुरांना कामे मिळु लागली. तोडणी, खुरपणी, कलम करणे. अदि कामे उपलब्ध झाली. विशेषत: तरुण वर्ग या धंद्याकडे आकर्षीत झाला. शेतकर्‍यांकडुन फुले घेऊन ते शिर्डीला पाठवु लागला. त्यातुन तरुण वर्गाला अर्थिक प्राप्त होऊ लागली. फुलशेतीत राबता राहिल्याने कलम करण्याची कला तरुणांना अवगत झाली. अस्तगाव येथील 200 ते 250 तरुण आज विविध फुलझाडे, फळझाडे यांच्यावर कलम करण्यात कुशल आहेत. येथील युवकांना जिल्ह्यांत व जिल्ह्याबाहेर तसेच परराज्यातही कलम करण्यासाठी मागणी आहे.

या पंचक्रोशीत छोट्या मोठ्या 70 ते 80 नर्सर्‍या उभ्या आहेत. 150 एकरात फुलशेती उभी आहे. ग्राहकांची मागणी गुलाब रोपांबरोबरच इतर रोपांनाही वाढु लागल्याने सर्व प्रकारच्या रोपांनी परिपूर्ण करण्याचा येथील नर्सरीधारकांचा प्रयत्न आहे. तशी रोपेही उपलब्ध केली आहेत. लाखो रुपयांची उलाढाल या व्यवसायातुन होत आहे. डुंगरवाल यांची प्रविण रोझ नर्सरी, संदेश रोझ नर्सरी यांनी जिल्ह्यात तसेच जिल्ह्याबाहेरही चांगले नाव कमावले. अस्तगाव माथ्यावर सह्याद्रि नर्सरी च्या माध्यमातुन सौ. मंदाताई शरदराव निमसे यांनी ओसाड माळरान फुलविले. ज्ञानेश्वर अंबादास जेजुरक यांची माउली नर्सरी, संजय जेजुरकर यांची सावता रोझ नर्सरी, टिळेकर नर्सरी, सुनिल त्रिभान यांची अक्षय नर्सरी, दत्तात्रय लक्ष्मण त्रिभान यांची दत्तकृपा नर्सरी, आबासाहेब नळे यांची हिमालय नर्सरी, रविंद्र जेजुरकर यांची डाळींबाची साई शुभम नर्सरी, ज्ञानेश्वर जेजुरकर यांची साईराज नर्सरी, भानुदास नळे यांची नर्सरी, भारत गोर्डे यांची नर्सरी या काही अशा काही निवडक नर्सर्‍या येथे प्रसिध्द आहेत.

गुलाबाची शेती फायदेशीर ठरत असल्याने अनेक शेतकरी गुलाबाच्या शेतीकडे वळाले आहेत. याच बरोबर अनेक जण फुलविक्रीच्या व्यावसायात गुंतले आहेत. फुलउत्पादकांकडुन 15 ते 25 रुपये शेकड्या प्रमाणे खरेदी करुन ही मंडळी 40 ते 50 रुपये शेकड्याप्रमाणे विकतात. साई संस्थानने मंदिर परिसरात फुल विक्रीचा खास परवाना दिलेला आहे. अस्तगाव चे अनेक शेतकरी शिर्डी कडे सकाळी आपल्या दुचाकीवरुन घेवुन जातात. दुधाच्या किटल्या सकाळी ज्या प्रमाणे सकाळी दुचाकीला असतात. त्याचस्वरुपात गुलाबाच्या पिशव्या आपल्या दुचाकीला अडकवुन येथील तरुण शिर्डीच्या दिशेने जात असतो.

Related Stories

No stories found.