अस्तगावला बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार!

अस्तगावला बिबट्याच्या हल्ल्यात दोन शेळ्या ठार!

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अस्तगाव येथील अस्तगाव-पिंप्रीनिर्मळ रोड लगत असलेल्या जेजुरकर वस्तीवर एका शेतकर्‍याच्या दोन शेळ्यावर बिबट्याने हल्ला करत त्यांना ठार केले. हा प्रकार काल गुरुवारी सायंकाळी 7.45 वाजता घडली. भर वस्तीत बिबट्याने हल्ला केल्याने रहिवश्यांमध्ये घबराट पसरली आहे.

येथील बाबासाहेब किसन जेजुरकर याच्या दोन मोठ्या शेळ्या बिबट्याच्या शिकार ठरल्या आहेत. त्यांच्या या दोन्ही शेळ्या घरासमोरील लिंबाच्या झाडाखाली बांधलेल्या होत्या. त्या शेळ्यांवर बिबट्याने हल्ला केला. यावेळी शेळीचा आवाज आल्याने बाबासाहेब जेजुरकर व अन्य कुटूंबिय बाहेर आले. माणसांची चाहुल लागताच बिबट्याने शेळ्यांचा जीव घेत तेथून पोबारा केला. बाबासाहेब यांना त्यांच्या गिन्नी गवताच्या शेतात काही तरी पळाल्याचा आवाज आला. शेळ्यांना दोन्हीही ठार केल्याचे त्यांच्या लक्षात आले.

शेजारील अविनाश जेजुरकर व अन्य रहिवाश्यांनी बाबासाहेब यांच्या घराकडे धाव घेतली. या गरीब शेतकर्‍याच्या दोन्ही शेळ्या बिबट्याने ठार केल्याने या शेतकर्‍यास अश्रु आवरता आले नाही. या घटनेची माहिती अविनाश जेजुरकर यांनी डॉ. उमेश पंडूरे यांना दिली. डॉ. पंडूरे तसेच वनविभागाचे कर्मचारी जेजुरकर यांच्या वस्तीवर आज शुक्रवारी पंचनामा करणार आहेत. दरम्यान जेजुरकर वस्ती भागातील सर्वच उस तुटून गेले असल्याने बिबट्यांचा आता मुक्त वावर आहे. या परिसरात पिंजरा लावावा अशी मागणी अविनाश जेजुरकर, रविंद्र जेजुरकर, ग्रामपंचायत सदस्य सुरेश जेजुरकर, माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे यांनी केली आहे.

तरकसवाडीला एक शेळी फस्त !

दरम्यान दोन दिवसांपुर्वी अस्तगावच्या तरकसवाडीतही बिबट्याने गोरक्षनाथ सखाराम तरकसे या शेतकर्‍यांच्या गोठ्यातील मोठी शेळी फस्त केली. त्यांच्या गोठ्यात 8 शेळ्या बांधलेल्या होत्या. त्यांचे चुलते पांडूरंग सखाराम तरकसे रात्री दिड वाजता शेजारीच घासाला पाणी भरत होते. तरकसे यांच्या गायी ओरडण्याचा आवाज त्यांनी ऐकला. म्हणून त्याबाजुला पाहिले तर त्यांनी बिबट्याने शेळीवर हल्ला करत असल्याचे दिसूझन आले. त्यांनी तात्काळ गोरक्षनाथ तरकसे यांच्या कुटूंबियांना जागे केले. तो पर्यंत बिबट्याने तेथून शेळी फस्त करुन धूम ठोकली. त्या आगोदर चोळके काका पुतण्यावर बिबट्याने हल्ला केला होता. याप्रकारांमुळे अस्तगाव भागात खळबळ उडाली आहे.

Related Stories

No stories found.