अस्तगावचे ग्रामदैवत जगदंबामाता आजपासून यात्रोत्सवास प्रारंभ

अस्तगावचे ग्रामदैवत जगदंबामाता आजपासून यात्रोत्सवास प्रारंभ

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

राहाता तालुक्यातील अस्तगाव येथील जगदंबा मातेच्या यात्रोत्सवास गरुवार दि. 21 पासून प्रारंभ होणार आहे. तीन दिवस चालणार्‍या या यात्रेनिमीत्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

येथील ग्रामदैवत जगदंबा माता पंचक्रोशीतील भाविकांचे श्रध्दास्थान आहे. माहुर हे मुळस्थान असलेली जगदंबा मातेला रेणुका माता असेही संबोधले जाते. येथील बाजारतळ परिसरात जगदंबा मातेचे भव्य असे आकर्षक मंदिर आहे. ग्रामस्थांनी या मंदिराचा जिर्णोध्दार केला आहे. देवीची मुर्ती म्हणजेच तांदळा असून मुर्तीकडे पाहिल्यास प्रसन्नता वाटते.

प्रत्यक्षात आजपासूनच या यात्रेस प्रारंभ होत आहे. देवीची पालखी आज गुरुवारी संध्याकाळी 8 वाजता निघणार आहे. शुक्रवार दि. 22 एप्रिल रोजी पहाटे आरती, पुजा करण्यात येईल. या दिवशी संध्याकाळी 9 वाजता भळंद्याची मिरवणूक निघणार आहे. वैशिष्ट्यपूर्ण असलेले हे भळंदे व त्याची मिरवणूक पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होते. मातीचे कच्चे भांडे त्यात कापडाचे पलिदे व तुपाने ते तेवत असतात. हे भांडे (भळंदे) देवीचे भक्त हातात घेवून मिरवणुकीने संपूर्ण गावाला फेरी मारतात. विविध वाद्य वाजवत तसेच भजने गात ही मिरवणूक देवीच्या मंदिरात येवून तेथे आरती होवून भळंदे मिरवणुकीची सांगता होते.

शनिवार दि. 23 रोजी सकाळी 8 वाजता मारुती मंदिराच्या पारावर हजेरीचा कार्यक्रम होतो. त्यात विविध कलाकार हजेरी लावतात. दुपारी 5 वाजता कुस्त्यांचा फड भरतो. यात्रेत विविध ठिकाणचे मल्ल हजेरी लावतात. या यात्रेत लिंब नेसणे हा प्रकार असून आपला नवस फेडण्यासाठी नवस बोलणारा संपूर्ण अंगाला लिंबाचा पाला गुंडाळून वाजत गाजत देवीच्या मंदिरात दर्शन करुन नैवद्य वाहतात. अशी ही वैशिष्ट्यपूर्ण यात्रेस पंचक्रोशितील भाविकांची मोठी गर्दी असते.

करोनामुळे दोन वर्ष यात्रा बंद होती. यंदा करोनाचे मळभ दूर झाल्याने या यात्रेला गर्दी वाढणार आहे, असे जगदंबा माता ट्रस्ट व देवालयांचे अध्यक्ष वाल्मिकराव गोर्डे यांनी सांगितले. यात्रेनिमित्त मंगळवार दि. 26 एप्रिल रोजी रात्री मोफत सविता राणी पुणेकर यांच्या लोकनाट्य तमाशाचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश कारखान्याच्या सहकार्याने मंदिर परिसर अग्निशमन यंत्राने स्वच्छ करण्यात आला आहे.

Related Stories

No stories found.