राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata
अस्तगावला गोदावरी कालव्यावरील लोखंडी पूल जलसंपदाच्या दिरंगाईने रखडला आहे. अस्तगावला गोदावरी कालव्याला सातमोर्या आहेत. दोन ओढ्यांचा संगम या मोर्यांजवळ होतो. त्यामुळे या मोर्या पावसाळ्यात किमान दोन महिने तुडूंब भरून वाहतात. या मोर्यांखालून गावाच्या पूर्व भागातील रहिवाशी तसेच गणेशनगर, रांजणगाव, एकरुखे व अन्य गावचे प्रवाशी जातात. मात्र मोर्या खालून पाणी असल्यावर वाहतूक खोळंबते. यापेक्षाही पायी जाणारा येणारांना याचा मोठा फटका बसतो. शाळकरी मुले, गावात दूध घालण्यासाठी येणारी दूध उत्पादक, बाजारकरू तसेच अन्य गावाला जाणार्यांना याचा मोठा त्रास होतो.
ग्रामस्थांच्या मागणीवरून महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जलसंपदा विभागाला पत्रही दिले व पादचारी पूल करावा, अशी सुचनाही केली होती. यासाठी त्यांचे स्विय सहायक प्रमोद रहाणे यांनी अधिकार्यांसमवेत पाहणी केली. परंतु जलसंपदाच्या दुर्लक्षामुळे हा पूल रखडला आहे.
सध्या या मोर्याखालून पाणी वाहते आहे. खरेतर गावाला या मोर्यांवरून सर्वांना जाण्या येण्यासाठी मोठा पूल गरजेचा आहे. परंतु त्याचे बजेट खुप मोठे आहे. गावापासून काही अंतरावर एक पूल आहे. परंतु तो शाळकरी मुलांना, रहिवाश्यांना काहीसा गैरसोयीचा आहे. सात मोर्यांपासून गाव हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे त्या कोर्हाळे पूल म्हणून ओळखल्या जाणार्या पुलाकडे कुणीही फिरकत नाही. परिणामी मोठी गैरसोय सध्या व पावसाळ्यात ग्रामस्थांची होत आहे. जलसंपदा विभागाने किमान पादचारी व काही चारचाकी वाहने जातील असा पूल बनवावा, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते अनिल पठारे यांनी केली आहे.