अस्तगावच्या तहकूब झालेल्या ग्रामसभेला आजचा मुहूर्त

Gramsabha
Gramsabha

अस्तगाव |वार्ताहर|Astgav

अस्तगाव ग्रामपंचायतीने 26 जानेवारी रोजी आयोजित केलेल्या ग्रामसभेस गर्दी नसल्याने ती सभा तहकूब करून आज शुक्रवारी सकाळी 9.30 वाजता आयोजित करण्यात आली आहे.

जलजीवन मिशन या महत्त्वाच्या विषयावर ही सभा आयोजित करण्यात आली होती. ही पंतप्रधान मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना जलजीवनसाठी अस्तगावला 4.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. ना. राधाकृष्ण विखे पाटील व खा. डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रयत्नातून हा निधी मंजूर झाला आहे. ग्रामसभेत या विषयावर चर्चा होऊन त्याची अंमलबजावणी कशी करायची यावर चर्चा होणार होती.

परंतु अवघे 56 ते 58 जण 26 जानेवारी रोजी उपस्थित होते. 17 सदस्यांपैकी सरपंच, उपसरपंच, माजी सरपंच व तीन चार सदस्य उपस्थित होते. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये नाराजी होती. वास्तविक या सदस्यांना ग्रामस्थांनी गावाचा कारभार पाहण्यासाठी निवडून दिले. ते उपस्थित राहत नाही. 17 हजार लोकसंख्या असलेल्या गावची ग्रामसभा कोरमअभावी पुढे ढकलण्याची वेळ येते.

गावच्या विकासाची चर्चा होऊन ते राबविण्यासाठी ग्रामसभेची मते महत्त्वाची असतात. मात्र याकडे ग्रामस्थही दुर्लक्ष करतात. पावसाळ्यात अस्तगावचा ओढा गाजतो. ग्रामपंचायतीने हा ओढा रुंद करून खोली वाढविल्यास पावसाळ्यातील कटकट मिटून जाईल. स्वच्छता अभियान राबविण्याची गरज आहे. अस्तगाव-खंडाळा रस्त्याने जाणारांना दुर्गंधी आणि अस्वच्छतेचे दर्शन होते. विखे पाटील मोठा निधी देतात, मंजूर करवून आणतात. मात्र ग्रामपंचायतीने या गोष्टीकडे लक्ष देण्याची गरज आहे. दशक्रिया स्थळीही दुचाकी, अथवा चारचाकी वाहने लावण्यासाठी कमी जागा आहे.

यासाठी जागा उपलब्ध होण्यासाठी काय करता येईल याची चर्चा ग्रामसभेत व्हावी. तेथे स्वच्छता असायला हवी. दहाव्याला अनेक गावचे लोक येतात. त्यांची गैरसोय तेथे होते. मोठ्या मोठ्या योजना राबवूनही स्वच्छ पिण्याचे पाणी प्यायला मिळते का? गावाला जारचे पाणी विकत घ्यावे लागते. दुकानदारांनी अतिक्रमण तर केलेच पण असे असूनही पुढे पुढे दुकाने वाढविण्याची स्पर्धा करण्याची हौस अतिक्रमण करणारांमध्ये आहे. तिला रोखले पाहिजे.

ओढा ते मश्जिद या अंतरातील दुकानांनी तर कहरच केला. पुढे जागा दिसली की शेड उभारायचे आणि पुढे त्या शेडला भिंती बांधून दुकान वाढवायचे, असा प्रकार सर्रास सुरू आहे. बाजारतळाच्या पुर्वेकडील रस्ता अरुंद बनला आहे. तेथे असलेल्या दुकानांपुढे दुचाकी उभ्या असतात. चारचाकी तेथून घेऊन जायचे म्हटल्यावर चालकाच्या अंगावर काटा उभा राहतो. यासारखे विषय ग्रामसभेत यायला हवेत. गावाचा गावपण टिकविण्यासाठी अतिक्रमण येथून पुढे वाढवू देऊ नका अशी सर्व सामान्य ग्रामस्थांची अपेक्षा आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com