अस्तगाव |वार्ताहर| Astgav

अस्तगाव ग्रामपंचायतीची निवडणूक झाली, निकालही लागला, आता सरपंच कोण होणार हे गुरुवारी ठरेल! ग्रामपंचायतीच्या

या नविन पदाधिकार्यांपुढे अतिक्रमणे, अंतर्गत रस्त्यांची कामे आदींचे मोठे आव्हान आहे.

अस्तगावातील या निवडणुकीत गावांतर्गत वस्त्यांवर जाणारे रस्ते, अतिक्रमणे ही जाहीररित्या गाजली नसली तरी ग्रामस्थांमध्ये या प्रश्नांची मोठी खदखद आहे. अस्तगाव- एकरुखे रस्ता, पळस वाट, अस्तगाव-पिंप्रीनिर्मळ शिव रस्ता, तसेच इतरही पाणंद रस्ते, याकडे लक्ष द्यावे लागणार आहे. याशिवाय सात मोर्यांवर काँक्रिटचा पूल, हे प्रश्न ज्वलंत आहेत. या प्रश्नाचा पाठपुरावा अथवा ती कामे होण्याकामी पाच वर्षांत विद्यमान पदाधिकार्यांना जागरुक राहावे लागणार आहे.

ग्रामपंचायत म्हणजे आलेल्या निधीवर डल्ला मारणे नव्हे! तर पाच वर्षांत नागरिकांच्या आवश्यक व हिताची कामे करावी लागणार आहेत. आमदार राधाकृष्ण विखे पाटील हे गावाला नेहमीच झुकते माप देतात. अनेक कामे त्यांनी केलेली आहेत. परंतु ग्रामपंचायतीचा निधी वापरताना तो अभ्यासुवृत्तीने वापरण्याची गरज आहे. गावाला तीन वाड्या आहेत. त्यामुळे त्यांच्याकडेही दुर्लक्ष करून चालणार नाही.

अस्तगावमध्ये ग्रामपंचायतची निवडणूक सुरू असताना अनेक अतिक्रमणेही झाली. ती ही चक्क ओढ्यात! गावातून जाणार्या ओढ्यांची लांबी 600 फुटाची आहे. परंतु प्रत्यक्षात आता अतिक्रमणामुळे ती एका ठिकाणी तर पाच ते सात फूट राहिली आहे. मटन मार्केट आणि त्याजवळ झालेल्या दुकानांनी ओढा आडविण्याचे काम झाले आहे. दुकानांसमोर टाकलेल्या भरी, व रहिवाश्यांनी ओढ्यात भरी टाकल्याचे दिसत आहे.

गेल्या पावसाळ्यात पुराचे तांडव गावाने अनुभवले आहे. आमदार विखे पाटील यांनी ओढ्यांवरील अतिक्रमणे काढण्याच्या सूचना दिलेल्या आहेत. महसूल यंत्रणा, ग्रामपंचायत यंत्रणा यांनी किती यावर काम केले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. पावसाळे चांगले होत आहेत. त्यामुळे दूर अंतरावरून पावसाचे पाणी या ओढ्यांमधून वाहून येते.

ओढ्याला चरही काढलेला नाही. त्यातच ओढ्यातून भुमिगत गटार काढल्याने व ते सिमेंटचे पाईप पृष्ठभागापर्यंत असल्याने चराचा मोठा प्रश्न आहे. चर काढताना त्याला रुंदी घ्यावी लागणार आहे. लहान चर केला तर त्यात पाणी बसेल का? हा प्रश्न असल्याने ओढा रुंद करावा लागणार आहे.

या ओढ्याला व्यवस्थित आकार नसल्याने गावाचे गावपण हरवले आहे. गटाराचे स्वरुप प्राप्त झाले आहे. यासाठी सुशोभिकरण करून अतिक्रमणे हटविली पाहिजे. असा ग्रामस्थांचा सूर आहे. रहदारीला अडचणी आणि ओढ्याला अडचणी अशा ठिकाणची अतिक्रमणे जाणिवपूर्वक काढली पाहिजेत. अस्तगावची मुख्य गल्ली वेशीतून जाते.

या गल्लीलाही अतिक्रमणाची बाधा झाली आहे. पूर्व पश्चिम रस्ता अडल्याने या गल्लीत ग्राहक फिरकत नाही, परिणामी छोटे मोठ्या व्यावसायिकांना दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. ग्रामपंचायतीने हा रस्ता सरळ प्राथमिक शाळेपर्यंत रुंद करून मजबूत करण्याची गरज आहे. ही गल्ली पूर्वी अस्तगावचे वैभव होती. मुख्य बाजारपेठ होती. तीला खुले करण्याची गरज आहे.

दशक्रिया घाटाजवळ दशक्रियाच्या वेळी नागरिकांची आणि वाहनांची मोठी गर्दी होते. वाहनांना पार्किंग असावी, दशक्रियाला येणारांना बसता यावे यासाठी तेथे ग्रामपंचायतीने स्वच्छता आणि मोकळी जागा करण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. सातमोर्याकडे जाणार्या रस्त्याच्या कडेची साईड गटार मोठ्या सिमेंटच्या नळ्या टाकून बुजवायला हवीत, म्हणजे तेथे काही प्रमाणात पार्किंग होईल.

प्राथमिक आरोग्य केंद्राजवळील सातपीर बाबा जवळ मोठी झुडूपे उगली आहेत, गवतही वाढलेले आहे. ही स्वच्छता कुणी करावी? हा प्रश्न आहे. वाळू चोरांनी या मंदिरालगतची वाळू चोरून नेली. त्यामुळे मंदिर ओस पडले आहे.

वाड्या वस्त्यांवर ही लक्ष देण्याची गरज आहे. अनेक पाणंद रस्ते केलेले नाहीत, ते पूर्ण करण्याची गरज आहे. अस्तगाव पिंप्रीनिर्मळ शिवरस्त्याचा प्रश्न भिजत पडला आहे. त्या भागातील रहिवाश्यांना शेतात जाण्यासाठी पाच किमी अंतर पार करावे लागते. पळस वाट पावसाळ्यात त्या भागातील शेतकरी वर्गाच्या डोळ्यात पाणी आणते. अस्तगाव-एकरुखे रस्ता व त्याला जोडून असलेल्या पाणंद रस्ते चिखलमय होतात. या सर्वच रस्त्यांची तसेच अतिक्रमण काढण्यात विद्यमान ग्रामपंचायत पदाधिकार्यांना यश येवो!