अस्तगावला दोन गायींना लम्पी सदृश्य आजाराची लागण

पशुवैद्यकांच्या प्रयत्नातून दोन्ही गायींच्या तब्येतीत सुधारणा
अस्तगावला दोन गायींना लम्पी सदृश्य आजाराची लागण

राहाता |तालुका प्रतिनिधी| Rahata

अस्तगाव परिसरातील 35 चारी परिसरात अडीच वर्षाची पाच महिन्याची गाभण गाय व लोंढेवस्तीवरील दिड महिन्याच्या लहान कालवडीस लम्पी सद्दष्य लक्षणे आढळून आली आहेत.

35 चारी परिसरातील सुकदेव काशिनाथ जेजुरकर यांच्याकडील चार गायींपैकी एक गाभण गाय आजारी असल्याचे डॉ. संजय जेजुरकर खासगी पशुधन पर्यवेक्षक यांनी अस्तगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे सहा. पशुधन विकास अधिकारी डॉ. उमेश पंडुरे यांना भ्रमणध्वनीवरुन कळवले. डॉ. उमेश पंडुरे यांनी जेजुरकर यांच्या वस्तीवर भेट देऊन आजारी गाय तपासणी करुन इतर तीन गायींची तपासणी केली असता एकच गाय आजारी असल्याचे निदर्शनास आले.

अस्तगाव पशुवैद्यकीय दवाखान्याचे पालक अधिकारी बाभळश्वर येथील डॉ. महेश भालेराव व राहाता तालुका लघु पशु चिकित्सालयाचे सहाय्यक आयुक्त डॉ. प्रज्ञा ओहोळ यांनी सुकदेव जेजुरकर यांच्या वस्तीवर भेट देऊन आजारी गायीची तपासणी करून नमुने तपासणीसाठी पुणे येथील शासकीय प्रयोगशाळेत पाठवले. यासाठी पशुधन विकास अधिकारी डॉ. शैलेश बन यांचे सहकार्य लाभले.

जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ. सुनिल तुंबारे व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. संजय कुमकर यांच्या मार्गदर्शनाखाली आजारी गायीवर उपचार व प्रतिबंधक उपाययोजना करण्याचे आदेश देण्यात आले. श्रीरामपूर रोडवरील लोंढे वस्तीवरील सुनिल रामदास लोंढे यांच्या दिड महिने वयाच्या लहान कालवडीच्या अंगावर लम्पी सद्दष्य काही फोड असल्याचे डॉ. सतिष गाडेकर यांना आढळले. तेथेही डॉ. उमेश पंडुरे यांनी भेट देऊन वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उपचार सुरु करण्यात आले.

अस्तगाव येथे लम्पी सदृष्य आजारी जनावर आढळून आल्याने डॉ. सुनिल तुंबारे, डॉ. संजय कुमकर, डॉ. प्रज्ञा ओहोळ, डॉ. महेश भालेराव, डॉ. शैलेश बन, पंचायत समितीचे सहा. पशुधन विकास अधिकारी डॉ. किशोर शेळके, कंट्रोल अधिकारी डॉ. नितीन निर्मळ या सर्वांनी मिळून पाच किमी परिघाची पहाणी करून ईपीसेंटरची स्थापना केली व बाधीत जेजुरकर वस्तीपासून 5 किमी वर्तुळाकार परिघात बाहेरुन लसीकरणाची सुरवात केली. यामध्ये अस्तगाव, चोळकेवाडी, मोरेवाडी रांजणगांव खुर्द, एकरुखे पिंपळस व राहाता अशी सात गावे येतात.

या गावात तात्काळ लस उपलब्ध करून लसीकरणाच्या टिम तयार करण्याच्या सूचना डॉ. सुनिल तुंबारे यांनी दिल्या. सुकदेव जेजुरकर यांची गाय व सुनिल लोंढे यांची लहान कालवड उपचारास दाद देऊन त्यांची तब्येत सुधारात असल्याचे डॉ. पंडुरे यांनी सांगितले. याकामी खासगी डॉ. संजय जेजुरकर व डॉ. सतिष गाडेकर, शाम चोळके यांचे सहकार्य मिळाले. पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पा. यांनी बाधीत परिसरात लसीकरण करण्याच्या सूचना दिल्याची माहिती माजी सरपंच नंदकुमार गव्हाणे यांनी दिली.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com