वीज वितरणचा सहाय्यक अभियंता लाचेच्या जाळ्यात

भाळवणी कार्यालयात चार हजाराची लाच घेताना रंगेहाथ पकडले
वीज वितरणचा सहाय्यक अभियंता लाचेच्या जाळ्यात

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

वीज मीटर देण्याकरीता तक्रारदाराकडून चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या भाळवणी (ता. पारनेर) कार्यालयातील

सहाय्यक अभियंता लाचलुचपतच्या जाळ्यात अडकला. भाऊसाहेब गोविंद पगारे (वय- 44 रा. पाईपलाईनरोड, नगर) असे या अभियंत्याचे नाव आहे. लाचलुचपत विभागाच्या नगर पथकाने भाळवणी कार्यालयात सोमवारी ही कारवाई केली.

पारनेर तालुक्यातील जामगाव येथील तक्रारदार यांनी व त्यांच्या मित्रांनी एकत्रित पोल्ट्री व्यवसाय सुरू केला आहे. या व्यवसायासाठी विद्युत मीटर मिळण्याकरीता तक्रारदार यांनी फेब्रुवारी 2020 मध्ये ऑनलाईन कोटेशन भरले आहे. यासाठी आवश्यक फी चलनाने बँकेत जमा केली आहे. त्यानंतर तक्रारदार यांनी भाळवणी कार्यालयातील सहाय्यक अभियंता पगारे याच्याकडे विद्युत जोडणी करीता वेळोवेळी विनंती केली.

परंतू, पगारे यांनी मीटर उपलब्ध नसल्याचे कारण देत टाळाटाळ केली. पगारे यांनी विद्युत जोडणी देण्याकरीता तक्रारदार यांच्याकडे पाच हजार रूपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती चार हजार रूपये देण्याचे ठरले. तक्रारदार यांनी याबाबत नगर येथील लाचलुचपत विभागाकडे तक्रार दाखल केली. यानंतर नगर पथकाने सोमवारी भाळवणी कार्यालयात लाचेचा सापळा लावला.

यावेळी तक्रारदाराकडून चार हजार रूपयांची लाच स्वीकारताना पगारे याला रंगेहाथ पकडण्यात आले. पोलीस उपअधीक्षक हरीष खेडकर यांच्या पथकातील पोलीस निरीक्षक दीपक करांडे, शाम पवरे, पोलीस कर्मचारी तन्वीर शेख, प्रशांत जाधव, विजय गंगुल, रवींद्र निमसे, राधा खेमनर, संध्या म्हस्के, हरूण शेख यांच्या पथकाने ही कारवाई केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com