व्यंकटेश पतसंस्थेच्या पाच संचालकांची मालमत्ता जप्त; परीसरात खळबळ

 व्यंकटेश पतसंस्थेच्या पाच संचालकांची मालमत्ता जप्त; परीसरात खळबळ
श्रीगोंदा जमीन घोटाळा

सोनई (वार्ताहर) -

सोनई येथील व्यंकटेश ग्रामीण नागरी सहकारी पतसंस्थेतील ठेवीदारांच्या दोन कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणी महसूल विभागाने कारवाई करून पाच संचालकांच्या मालमत्तेवर टाच आणून मालमत्ता जप्त करण्याचे आदेश नगर विभागाचे उपविभागीय दंडाधिकारी श्रीनिवास अर्जुन यांनी दिले आहेत. या आदेशाने परीसरात खळबळ उडाली आहे.

बिगरशेती सहकारी पतसंस्थेचे संचालक, व्यवस्थापक व कर्मचारी यांनी ठेवीदारांना जादा रकमेचे आमिष दाखवून कोट्यावधी रुपयांच्या ठेवी स्वीकारून ते परत न केल्याने ठेवीदारांच्या तक्रारीवरून महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितरक्षण १९९९ व कलम ३, ४ प्रमाणे अप्पर जिल्हादंडाधिकारी, नगर, ९ब/८७४/२०२१ दि.३०/६/२०२१ नुसार ५ जुलैला आदेश दिला आहे.

या संचालक मंडळाच्या विरोधात सोनई पोलीस ठाण्यात गु.र.न.११/२०१८ भा.दं.वि.कलम ४०६, ४२०, ४६७, ४६८, ४७१, १२० (ब) व महसूल ठेवीदाराच्या हितसंबंधीचे रक्षण,. १९९९ चे कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. त्या अनुषंगाने ठेवीदारांचे पैसे मुदतीनंतर परत केले नाही, त्यामुळे पतसंस्थेच्या पाच संचालकांची मालमत्ता जप्त करण्याचे आदेश दिले.

या मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी उपविभागीय अधिकारी श्रीनिवास अर्जुन यांची सक्षम अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली असून मंडल अधिकारी व तलाठी यांना सातबारा उताऱ्यावर कब्जेदार सदरी महाराष्ट्र शासनाचे नाव लावण्याचे आदेश दिले आहेत. अन्य संचालकांवर लवकरच कारवाईची टांगती तलवार असल्याचे सांगितले जात आहे. महाराष्ट्र ठेवीदार अधिनियम १९९९ मधील कलम ४ चे पोटकलम (१) व ५ व कलम ८ प्रमाणे मा. अप्पर सचिव, गृहविभाग, मंत्रालय, मुंबई अधिसूचना २३-६-२१ नुसार संचालक मंडळाच्या मालमत्तेवर टाच आणून जप्त करण्याचे आदेश जारी करण्यात आले आहे.

मालमत्ता जप्तीचा आदेश झालेले पाच संचालक

संचालक अभय शांतीलाल चंगेडिया (दोन एकर एक गुंठा शेतजमीन), आनंद अशोकलाल भळगट (एक प्लॉट व दोन शेतजमीन), तेजकुमार हिरालाल गुंदेचा (दोन प्लॉट), गोपाल रुपचंद कडेल (११४ चौरसमिटरचा एक प्लॉट) व लक्ष्मण हरिभाऊ राशीनकर (एक एकर शेतजमीन) या मालमत्ता जप्त केल्याचे आदेश पारित केलेले आहेत.

Related Stories

No stories found.