विधानसभेत श्रीरामपूर पोलिसांची तिसर्‍यांदा चिरफाड

श्रीरामपूर पोलीस ठाण्याला चांगला अधिकारी मिळेल का?
विधानसभेत श्रीरामपूर पोलिसांची तिसर्‍यांदा चिरफाड

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या चार ते पाच वेळेस विधानसभेत वेगवेगळ्या आमदारांनी श्रीरामपूर पोलिसांच्या कार्यकर्तृत्वाची चिरफाड विधानसभेत केली होती. गेल्या काही प्रकरणात एक पोलीस निरीक्षक व तीन पोलिसांचे निलंबन करण्यात आले. तर काही पोलीस अधिकार्‍यांच्या बदल्या करुन त्यांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न झाला. आजही पोलिसांचे गुन्हेगारांशी कसे सबंध आहेत हे आ. लहू कानडे यांनी विधानसभेत दाखवून दिले. अशा पोलिसांना घरी बसविण्याची मागणीही केली.

श्रीरामपूर पोलीस ठाण्याचा कारभार विधानसभेत नेहमीच चर्चेत राहिला आहे. त्यामुळे पोलिसांच्या कार्यपध्दतीवर लोकप्रतिनिधींनी नेहमीच आक्षेप घेतला आहे. जिल्हा पोलीस अधिक्षकांकडून अशा पोलिसांबाबत काहीच कारवाई होत नसल्यामुळे त्यांना हा प्रश्न सरळ विधासभेत मांडावा लागला आहे.

बेकायदेशीररित्या अशोकनगर फाटा पोलीस चौकीचे प्रकरणही खूपच गाजले. अवैध व्यवसाय करणार्‍यांबरोबर संबंध ठेवून पोलीस अधिकार्‍यांनी पोलीस चौकी तयार केली होती. त्यामुळे या पोलीस अधिकार्‍यावरची बदली जिल्हा पोलीस अधिक्षकांंना नाईलाजास्तव कारवाई करावी लागली.

श्रीरामपूरचे लव्ह जिहादचे प्रकरण जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात गाजले होते. त्यावर सर्वप्रथम त्यावेळचे राज्याचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी हा प्रश्न विधानसभेत उपस्थित केला होता. मुल्ला कटर व त्याच्या साथीदारांना सहकार्य केले म्हणून त्यावेळी पोलीस निरीक्षकांवर कारवाई करण्यात आली होती. त्याचबरोबर पाच ते सहा पोलिसांचेही निलंबन करण्यात आले होते.

त्यानंतर श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील बर्डे हत्याप्रकरणी आ. निलेश राणे यांनी विधानसभेत प्रश्न उपस्थित करुन पोलीस अधिकारी गुन्हेगारांशी कसे जोडले गेले आहेत याची इत्यंभूत माहिती विषद केली होती. त्यानंतर आ. निलेश राणे यांनी श्रीरामपूर शहरात अशा पोलीस अधिकार्‍यांविरुध्द कारवाई करुन या आरोपींचा शोध घ्यावा म्हणून भाजपाच्यावतीने मोर्चा काढला होता.

श्रीरामपूर मधील पोलीस अधिकारी आरोपींना पाठिशी घालून त्यांच्याबरोबर हातमिळवणी करुन मौजमजा करत असल्यामुळेसर्वसामान्यांनाही त्यांचा धाक राहिलेला नाही. जोपर्यंत अशा पोलीस अधिकार्‍यांना घरी बसविले जात नाही तोपर्यंत या शहरातील कायदा व सुव्यवस्था सुधारु शकणार नसल्याचा घणाघात आ. लहू कानडे यांनी विधानसभेत केला.

पोलीस अधिकार्‍यांचे अशा प्रकारचे संबंध गुन्हेगारांशी जोडले गेलेले असतानाही त्यांच्या कृत्याकडे डोळेझाक केली जात आहे. श्रीरामपूर शहरातील काही गुन्हेगार राष्ट्रीय स्तरावर गुन्हे करत असतात. त्याची पाळेमुळे श्रीरामपुरात सापडली जातात. बाहेर राज्यातील पोलीस श्रीरामपूर शहरात तपासासाठी आले तर त्यांना स्थानिक पोलीस मदत करत नाही. उलट गुन्हेगारांना सावध करुन या ठिकाणाहून त्यांना पसार करण्यास मदत करतात, त्यामुळे बाहेरचे पोलीस आले तर यांची मदत मिळत नसल्यामुळे स्वतंत्रपणे त्यांच्या परीने तपास करतात यामुळे अनेकवेळा त्यांना रिकाम्या हातानेच जावे लागते. त्यामुळे या श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशनचे नाव खराब झाले आहे.

पोलीस अधिक्षकांचे श्रीरामपूरकडे दुर्लक्ष का?

वेगवेगळ्या राज्यातून तसेच जिल्ह्यातून गुन्हे करुन गुन्हेगार श्रीरामपुरात येत असतात. तसेच श्रीरामपूर शहरातही अनेक घटना घडत असतात. मात्र पोलिसांचे व गुन्हेगारांचे असलेले संबंधामुळे अनेकवेळा कारवाई होत नाही. त्यामुळे गुन्हेगारांचे बळ वाढले आहे. एखाद्या दिवशी मोठी घटनाही घडू शकते असे वातावरण आज पोलिसांंना दिसत नसले तरी सर्वसामान्य व्यक्ती मात्र हादरुन गेली आहे. अशा संवेदनशील पोलीस ठाण्यात चांगले अधिकारी मिळावे म्हणून अनेकवेळा पोलीस महासंचालक, पोलीस अधिक्षक यांच्याकडे मागणी केली. मात्र आहे तेच पोलीस चांगले आहेत म्हणून येथील पोलिसांवर कारवाई होत नाही. मोठे प्रकरण घडले तर ‘वरुनच’ काही कारवाई झाली तरच ते बदल होतात. आजही पोलीस अधिकार्‍यांकडून शहरात सर्वसामान्यांना चांगली वागणूक दिली जात नाही. उलट गुन्हेगारांशी संबंधित असलेल्या काही व्यक्तींना मानाने बसविले जाते. ही शोकांतिका पहावयास मिळत असतानाही पोलीस अधिक्षकही असे पोलीस अधिकारी कायम करतात, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com