न्यायालयातील कर्मचार्‍याला मारहाण; आरोपीला तीन वर्षे कारावास

जिल्हा न्यायालयाचा निकाल
न्यायालयातील कर्मचार्‍याला मारहाण; आरोपीला तीन वर्षे कारावास

अहमदनगर|प्रतिनिधी| Ahmednagar

न्यायालयाचे समन्स वॉरंट बजावण्यासाठी गेलेल्या कर्मचार्‍याला मारहाण केल्याप्रकरणी ज्ञानदेव भाऊसाहेब काळे (रा. शहापूर ता. नगर) याला न्यायालयाने दोषी धरून तीन वर्षे कारावास व पाच हजार रूपये दंड अशी शिक्षा ठोठावली आहे. जिल्हा व सत्र न्यायाधीश एम. आर. नातु यांनी हा निकाल दिला.

जिल्हा न्यायालयातील कर्मचारी गोविंद केशव कुलकर्णी हे न्यायालयाचे समन्स वॉरंट बजावण्यासाठी 15 नोव्हेंबर 2017 रोजी सकाळी शहापूर येथे ज्ञानदेव काळे यांच्या घरी गेले होते. यावेळी काळे हा कुलकर्णी यांना म्हणाला, समन्स वॉरंट बजावण्याचे अधिकार तुला कोणी दिले. असे म्हणत, कुलकर्णी यांना खाली पाडून मारहाण केली. वॉरंट हिसकावून घेत शासकीय कामात अडथळा आणला. याप्रकरणी कुलकर्णी यांनी भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून ज्ञानदेव काळे विरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. सहायक पोलीस निरीक्षक कैलास देशमाने यांनी या गुन्ह्याचा तपासकरून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी पक्षातर्फे सहा साक्षिदारांची साक्ष नोंदवली गेली. न्यायालयासमोर आलेले साक्षी पुराव्याच्या आधारे आरोपी काळे याला दोषी धरून तीन वर्षे कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. सरकारी पक्षातर्फे अ‍ॅड. विष्णूदास बोर्डे यांनी काम पाहिले. त्यांना पैरवी अधिकारी म्हणून सहायक फौजदार आर. एस. मकासरे यांनी मदत केली.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com