Asian Games 2023 : नगरच्या डिवायएसपी भोसलेंच्या कन्येने मिळविले सुवर्णपदक

ऋतुजाची टेनिस डबलच्या फायनलमध्ये शानदार कामगिरी, श्रीरामपूर आजोळ || कारेगावचे माहेर असलेल्या निता भोसलेंना यशाचे श्रेय
Asian Games 2023 : नगरच्या डिवायएसपी भोसलेंच्या कन्येने मिळविले सुवर्णपदक

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

आशियाई क्रीडा स्पर्धेत काल सातव्या दिवशी रोहन बोपन्ना आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसमध्ये सुवर्णपदकावर नाव कोरले. टेनिसमध्ये भारताला मिळालेलं हे पहिले सुवर्णपदक असून भारताचे हे एकूण नववे सुवर्णपदक आहे. दरम्यान, ऋतुजा अहमदनगर ग्रामीणचे डिवायएसपी संपतराव भोसले यांची कन्या आहे. श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे जन्मलेल्या ऋतुजा भोसले यांच्यावर या कामगिरीमुळे कौतुकाचा वर्षाव होत आहे.

19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेचा काल 7 वा दिवस होता. चीनमधील हांगझोऊ येथे काल शनिवारी सुरू झालेल्या या खेळांमध्ये मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले या भारतीय जोडीला पहिल्या सेटमध्ये दारूण पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यांना तैपेई जोडीने 6-2 ने पराभूत केले. यानंतर भारतीय जोडीने दुसर्‍या सेटमध्ये शानदार पुनरागमन करत तैपेईच्या अन-शुओ लियांग आणि त्सुंग-हाओ हुआंग या जोडीचा 10-4 असा पराभव करत सामना 1-1 असा बरोबरीत सोडवला. त्यानंतर दोघांमधील निर्णय सुपर टाय ब्रेकमध्ये घेण्यात आला, ज्यामध्ये रोहन बोपण्णा आणि ऋतुजा भोसले यांनी टेनिसच्या मिश्र दुहेरीत 10-4 असा शानदार स्कोअर करून इतिहास रचला आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताला आणखी एक सुवर्णपदक मिळवून दिले. ऋतुजाच्या रूपाने पहिल्यांदाच सुवर्णपदक मिळाले आहे.

दरम्यान, भोसले कुटुंब मूळ सोलापूर जिल्ह्यातील माळशिरसचे. संपतराव भोसले यांची श्रीरामपूर तालुक्यातील सासूरवाडी कारेगावची. संपतराव भोसले हे सध्या नगर येथे ग्रामीण डीवायएसपी म्हणून कार्यरत आहेत. त्यांनी यापूर्वी शिर्डी आणि शेवगावातही पोलिस निरीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. ऋतुजाचा जन्म श्रीरामपूर तालुक्यातील कारेगाव येथे झालेला आहे. तिने वयाच्या नवव्या वर्षीच टेनिस खेळण्यास सुरूवात केली. तिचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण पुण्यात झाले आहे. त्यानंतर उच्च शिक्षण अमेरिकेत झालेले आहे. हे शिक्षण घेतल्यानंतर ती 2017 साली पुन्हा भारतात आली. तिला प्रशिक्षक केदार शाह यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाचे श्रेय तिची आई आणि श्रीरामपुरातील कारेगाव माहेर असलेल्या निता भोसले यांना डीवायएसपी संपतराव भोसले देतात.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com