आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये होणार ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये होणार ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित

आश्वी |वार्ताहर| Ashwi

दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीवर अंकुश ठेवण्यासाठी नगर जिल्ह्यातील बहुतांशी गावांनी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर सुरू केला आहे. याचाच भाग म्हणून आपत्कालीन परिस्थितीत गावातील शेकडो मोबाईल एकाच वेळी वाजणार आहेत. त्यातून सर्व ग्रामस्थांना आपत्कालीन परिस्थितीची माहिती होऊन तात्काळ मदत मिळणार आहे. यासाठी आश्वी पोलीस ठाण्याच्या पुढाकारातून आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमधील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील, ग्रामपंचायत सदस्य व नागरिकांची नुकतीच बैठक पार पडली आहे.

या बैठकीसाठी ग्रामसुरक्षा यंत्रणेचे संचालक डी. के. गोर्डे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक नयन पाटील, पोलीस पाटील संघटनेचे संगमनेर तालुकाध्यक्ष अशोकराव थेटे, दिलिप डेगंळे, पत्रकार संजय गायकवाड, पत्रकार रवींद्र बालोटे, संरपच सतीश जोशी, नितिन सांगळे, किरण भुसाळ, विक्रम थोरात, उपसरपंच नानासाहेब उंबरकर आदींसह पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या गावातील सरपंच, ग्रामसेवक, पोलीस पाटील आदींसह नागरीक उपस्थित होते.

यावेळी डी. के. गोर्डे, पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांनी ग्रामसुरक्षा यंत्रणेबाबत सविस्तर माहिती दिली. पुर्वी प्रतिकुटुंब 250 रुपये वार्षिक खर्च असलेली यंत्रणा आता केवळ प्रति कुटुंबासाठी एका वर्षासाठी 50 रुपये अशा अत्यंत कमी खर्चात ही यंत्रणा गावांमध्ये कार्यान्वित होणार असल्याने परिसरातील प्रत्येक गावांने आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा सुरू करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी उपस्थितांना केले.

आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर दरोडा, वाहनचोरी, रस्ता लूट, महिला व लहान मुलांसंदर्भातील गुन्हे, अपघात, वन्यप्राण्यांचा हल्ला तसेच गावाला सतर्कतेचा इशारा यांची माहिती एका टोल फ्री क्रमांकावर यंत्रणेत सहभागी झालेल्या सर्व सदस्यांना एकाचवेळी मिळणार असून ही यंत्रणा अनेक दिवसांपासून आदर्श गाव हिवरे बाजार येथे वापरली जात असल्याची माहिती उपस्थितांना यावेळी दिली.

दरम्यान अडीज हजार गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित असून तेथे गुन्हेगारीचे प्रमाण थांबले असल्याची माहिती देण्यात आली. यामुळे नागरीक व गाव सुरक्षित राहणार असल्याचे सांगण्यात आले. तसेच जिल्हाप्रशासनाने या यंत्रणेवर खर्च करण्याची मुभा प्रत्येक ग्रामपंचायतीला दिली असल्याने लवकरच आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये ही यंत्रणा कार्यान्वित करण्याचा मानस उपस्थितांनी बोलुन दाखवला.

आश्वी पोलीस स्टेशन अंतर्गत येणार्‍या प्रत्येक गावांमध्ये आधुनिक ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यान्वित झाल्यानंतर गुन्हे व गुन्हेगारांची संख्या कमी होऊन गावे सुरक्षित होणार असल्याने प्रत्येक गावाने यामध्ये सहभागी होणे गरजेचे आहे.

- सुधाकर मांडवकर पोलीस निरीक्षक, आश्वी पोलीस ठाणे

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com