आश्वी खुर्दची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांपासून धूळ खात पडून

आश्वी खुर्दची पाणीपुरवठा योजना आठ वर्षांपासून धूळ खात पडून

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द येथील नवीन विस्तारीत पाणी पूरवठा योजनेचे काम ठेकेदाराचा निष्काळजीपणा व स्थानिक पदाधिकार्‍याच्या

उदासिनतेमुळे मागील आठ वर्षापासून अपुर्ण अवस्थेत आहे. ही योजना पुर्णत्वास नेण्यासाठी स्थानिक पदाधिकारी वारंवार अपयशी ठरत असल्याने भाजपचे ज्येष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी विकास कामासाठी उपलब्ध करुन दिलेल्या निधीतून काम पुर्णत्वास न गेल्याने नागरीकांमधून रोष व्यक्त होत आहे.

माजी मंत्री व भाजपचे ज्येेष्ठ नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून आश्वी खुर्द गावासाठी केंद्र शासनाच्या राष्ट्रीय पेयजल योजनेतून 1 कोटी 32 लाख 54 हजार 60 रुपये किंमतीची योजना मंजूर करण्यात आली होती. यातून गावासाठी 85 हजार लिटर पाणी क्षमता असलेली पाण्याची टाकी, वाड्या - वस्त्यासाठी विस्तारीत स्वरुपाची पाईप लाईन व इतर कामे मंजुर करण्यात आली.

24 जून 2014 ला या कामाचे उदघाटन होऊन एक वर्षाच्या मुदतीत काम पूर्ण करण्याचा ठेका देण्यात आला होता. परंतु ठेकेदाराने मागील आठ वर्षात केवळ 70 टक्के काम केले असून उर्वरीत 30 टक्के काम अपूर्ण ठेवले असतानाही या कामाचे सुमारे 1 कोटी रुपयापेक्षा अधिकची रक्कम ही बिलापोटी घेतली आहे.

आश्वी खुर्द येथील हभप वसंतराव वर्पे यांनी पाण्याची टाकी बाधंण्यासाठी स्वता:ची एक गुंठा जागा ग्रामपंचायतला दिली होती. त्या जागेवर बाधंण्यात आलेल्या 85 हजार लि. क्षमतेच्या टाकीत पाण्याचा एक थेंब ही आज पर्यंत आलेला नाही. तर या टाकीसाठी जागा देणारे वर्पे यांचे टाकी शेजारील 20 गुंठे क्षेत्र मागील आठ वर्षापासुन पडीक आहे, कारण टाकी शेजारी साहीत्य अस्ताव्यस्त पडल्याने त्यांना शेती करता येत नाही. परिसरातील विस्तारीत पाईपलाईन, वॉल, पंप हाऊस, विहिर दुरुस्ती, नविन विज पंप, बोर्ड हाऊस, रस्त्याच्या व प्रवरा उजव्या कालव्यातून जाणार्‍या पाईप लाईन, चेंबर हि सर्व कामे अपूर्ण असून विहीर ते टाकी अशी अति महत्वाची पाईप लाईन हि या ठेकेदाराने टाकलेली नाही. तर गावातील दलित वस्ती, आदिवासी वस्ती, शिंदे वस्ती व स्मशानभूमी परिसरातील पाईप लाईनचे काम मोठ्या प्रमाणात अपुर्ण अवस्थेत आहे.

ठेकेदाराने या कामाचे सुमारे एक कोटी रुपयापेक्षा जास्त बील घेतले असताना ही मागील आठ वर्षापासुन हे काम रखवडले आहे. त्यामुळे गावासह वाडी वस्ती वरील नागरीकांना पाण्याचा पुरवठा करता येत नसल्याने त्यांची पाण्यासाठी वणवण सुरु असल्याने या ठेकेदारा विरोधात नागरीक संताप व्यक्त करत आहेत.

दरम्यान एक वर्ष मुदतीचे काम सात वर्षानंतर हि अपूर्णच ठेवले असल्याने जिल्हा परिषदेने ठेकेदारावर कारवाई करावी अशी मागणी आश्वी खुर्द येथिल नागरीक करत असले तरी स्थानिक पदाधिकारी कोणतीही ठोस भुमिका घेत नसल्याने माजी मंत्री आ. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यंत्रणेने याची दखल घेऊन पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वारंवार करुनही त्याची दखल घेतली जात नसल्यामुळे कोटी रुपयाची योजना खर्च होऊनही अपुर्ण अवस्थेत धुळ खात पडून आहे.

राष्ट्रीय पेयजल योजनेचे काम मागील आठ वर्षापासून रखडलेले असून हे काम पूर्ण व्हावे यासाठी आम्ही गटविकास अधिकारी संगमनेर, जिल्हा परिषदेचे पाणी पूरवठा विभागाचे अभियंता व जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे पत्र व्यवहार करत पाठपुरावा करुन त्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकण्याची मागणी केली आहे. मात्र या अधिकार्‍याकडून आमची कोणत्या हि प्रकारची दखल घेतली जात नाही.

- म्हाळू गायकवाड, सरपंच आश्वी खुर्द

भाजप नेते आ. राधाकृष्ण विखे पाटील हे आपल्या शिर्डी मतदार संघाच्या विकास कामासाठी केंद्र व राज्य सरकारचा निधी मोठ्या प्रमाणात आणून विविध योजना मार्गी लावण्याचे काम सातत्याने करत असतात. परंतू आश्वी खुर्द येथे विकास कामासाठी दिलेला निधी हा योग्य वापरला जात नसून अनेक योजना या स्थानिक पदाधिकारी व ठेकेदाराच्या हालगर्जीपणामुळे धूळखात पडून असल्याने आ. विखे पाटील यांनी यामध्ये लक्ष घालून आपल्या यंत्रणेला याबाबत सूचना करणे गरजेचे असल्याचे मत स्थानिक नागरीकांनी व्यक्त केले आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com