आश्वी खुर्द, पानोडी, दाढला दुकाने फोडली

आश्वी खुर्द, पानोडी, दाढला दुकाने फोडली

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील आश्वी खुर्द व पानोडी तसेच राहाता तालुक्यातील दाढ बुद्रुक या परिसरात मंगळवारी मध्यरात्री भुरट्या चोरांनी अनेक दुकानांचे शटर उघडून चोरी करण्याचा प्रयत्न केला. मात्र, या दुकानात मोठी रोख रक्कम नसल्याने केवळ किरकोळ रोख रक्कम, मोबाईल व चिल्लरवर चोरट्यांना समाधान मानावे लागले. या चोर्‍यांबाबत आश्वी पोलीस ठाण्यात कोणीही तक्रार दाखल केली नसल्याची माहिती मिळाली आहे. मागील अनेक दिवसापासून आश्वीसह पंचक्रोशीतील गावांमध्ये भुरट्या चोर्‍यांचे प्रमाण वाढले असून अनेक ठिकाणी लहानमोठ्या चोर्‍या झाल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

मंगळवारी मध्यरात्री पानोडी येथील संदीप वाडेकर व संदीप जाधव यांच्या जनावराच्या औषधांच्या दुकानाचे शटर उचकटून चोरी करण्याचा प्रयत्न झाला. आश्वी खुर्द येथे बाजारतळावरील सुनील सोनवणे यांचे कृषीसेवाचे दुकान फोडण्यात आले आहे. या दुकानामध्ये जास्त रोख रक्कम नसल्याने केवळ किरकोळ रक्कम व चिल्लरवरच चोरट्यांना समाधान मानत हात हालवत परत जावे लागले. तर दाढ बुद्रुक येथेही तीन दुकाने चोरट्यांनी फोडल्याची माहिती मिळाली असून बाबासाहेब चंद्रभान जोधंळे यांचे कृषीसेवा दुकानातून 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल व 4 हजार रुपये रोख तसेच सचिन प्रल्हाद तांबे यांच्या दुकानातून स्प्रे, अंतर व 3 हजारांची चिल्लर घेऊन चोरट्यांनी पोबारा केला.

आश्वी खुर्द येथे चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या चोर्‍यांबाबत आश्वी पोलीस ठाण्यात कोणताही गुन्हा दाखल झालेला नसून दिवसेंदिवस भुरट्या चोर्‍याचे प्रमाण वाढत असल्याने रात्री पोलिसांनी गस्त वाढविण्याबरोबरच या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. दरम्यान कृषीसेवा केंद्र व मेडिकल दुकाने चोरट्याकडून टार्गेट होत असल्याचे दिसून येत असून करोना काळानंतर अर्थिक घडी बसवित असताना चोरीच्या दिवसेंदिवस वाढत असलेल्या घटनांमुळे व्यापारी, व्यावसायिक व नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com