आश्वी परिसरातील अवैध दारुविक्री थांबण्यासाठी परवानाधारक सरसावले

File Photo
File Photo

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील तसेच शिर्डी विधानसभा मतदार संघातील दारु विक्री परवाना धारकांनी आश्वी परिसरात होत असलेली बेकायदेशीर दारूविक्री त्वरीत बंद व्हावी यासाठी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस अधीक्षक तसेच उत्पादन शुल्क अधिकार्‍यांना निवेदन दिले असून आता अवैध दारु विक्री बंद होणार का? याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.

याबाबत परवानाधारक विक्रेत्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, कोविड - 19 च्या लॉकडाऊन काळात जीवनावश्यक वस्तूंची विक्री सोडून सर्व व्यवहार ठप्प होते. यावेळी परवाना धारक दारू दुकानेही बंद होती. त्यामुळे आंबट शौकिनांची होणारी तगमग ओळखून आश्वीसह परिसरात बेकायदेशीर दारू विक्रीला सुगीचे दिवस आले होते.

यामुळे आव्वाच्या सव्वा किमतीने अवैध दारू विक्री केली जात होती. हळूहळू करोना संकट दूर झाल्यानंतर उद्योग व्यवसायासह शासकिय, निमशासकिय व इतर कामे सुरुळीत झाली. परवाना धारक दारू व्यवसाय सुद्धा सुरू झाले. दोन वर्षांच्या कार्यकाळात आंबट शौकिनांची पाऊले बेकायदेशीर दारू दुकाने हॉटेलकडेच वळत असल्याने परवानाधारक दारू विक्री करणार्‍यांवर माशा मारण्याची वेळ आल्याचे चित्र आहे. त्यामुळे परवानाधारक विक्रेत्यांना शासकिय कर भरणे मुश्कील होऊ लागले आहे. याकडे पोलीस व उत्पादन शुल्क अधिकारी व कर्मचार्‍यांकडून डोळेझाक होत असल्याचा गंभीर आरोप परवानाधारक विक्रेत्यांनी केला आहे.

अवैध दारू विक्री लहान सहान टपर्‍या व हॉटेलमध्येही खुलेआम केली जात आहे. यामध्ये आश्वी बुद्रुक व प्रतापपूर शिवालगत असलेल्या विश्रामगृह परिसरात अनधिकृतपणे देशी व विदेशी मद्याची बेधडकपणे विक्री सुरू असल्याची चर्चा आहे. आश्वी खुर्द, ओझर, दाढ खुर्द, शिबलापूर, पानोडी, शेडगाव, खळी, पिंप्री, चणेगाव, झरेकाठी आदी गावाच्या शिवारात अवैध दारू विक्री होत असूनही पोलीस याकडे डोळेझाक करत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

दरम्यान बेकायदेशीर दारू विक्रीमुळे नागरिकांबरोबरच परवानाधारक विक्रेत्यांनाही त्रास सहन करावा लागत असल्याने आश्वी व परिसरात बेकायदेशीर होणारी दारू विक्री त्वरीत बंद करावी, अशी मागणी पी. एन. उंबरकर, श्रीमती उषादेवी लक्ष्मणराव देवळालकर यांनी जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे.

आश्वी सह परिसरातील बेकायदेशीर दारू विक्री बाबत वारंवार प्रशासनाला कल्पना दिली असून ही अवैध दारू विक्री बंद न झाल्यास परवाना धारक विक्रेत्यांनी उप मुख्यमंत्री तथा उत्पादन शुल्क विभागाचे मंत्री अजित पवार यांची शिष्टमंडळासह भेट घेणार असल्याचा इशारा प्रशासनाला दिल्यामुळे या अवैध दारू विक्रेत्यांवर पोलीस जरब बसवणार का याकडे आश्वीसह परिसरातील सुज्ञ नागरिकांचे लक्ष लागले आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com