आश्वी |वार्ताहर| Ashwi

शिर्डी मतदार संघ व संगमनेर तालुक्यातील 14 ग्रामपंचायतींचे धक्कादायक निकाल समोर आले असून विखे पाटील गटाकडे असलेल्या

चिंचपूर, शेडगाव, झरेकाठी व पानोडी या ग्रामपंचायती थोरात गटाकडे गेल्याने आ. विखे गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे. तर ना. थोराताच्या ताब्यातील कनोली व मनोली ग्रामपंचायती विखे गटाने खेचून आणल्या आहेत. तसेच खळी ग्रामपंचायत निवडणुकीत ना. थोरात व आ. विखे पाटील सहमती एकस्प्रेसने बाजी मारल्याने चारही उमेदवार निवडून आले आहेत.

आश्वी पंचक्रोशीतील कनोली ग्रामपंचायतीत आ. विखे पाटील गटाचे 7 सदस्य निवडून आल्याने विखे गटाने सत्ता मिळवून सत्तातंर केले आहे. तर येथे ना. थोरात गटाचे 4 सदस्य निवडून आले आहेत.

ओझर बुद्रुक ग्रामपंचायतीत ना. थोरात गटाचे 8 सदस्य निवडून आल्याने थोरात गटाने सत्ता राखली आहे. येथे आ. विखे पाटील गटाला अवघ्या एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.

चणेगाव ग्रामपंचायतीत ना. थोरात गटाने मुसंडी मारल्याने त्याचे 7 सदस्य विजयी झाल्याने सत्ता मिळवली आहे. तर आ. विखे पाटील गटाचा अवघा 1 सदस्य निवडून आला आहे. याठिकाणी एक अपक्ष उमेदवार विजयी झाला आहे.

दाढ खुर्द ग्रामपंचायतीत आ. विखे पाटील गटाचे 7 सदस्य निवडून आल्याने सत्ता राखली असून ना. थोरात गटाचे अवघे 2 सदस्य विजयी झाले आहेत.

प्रतापपूर ग्रामपंचायतीसाठी आ. विखे यांना मानणार्या तीन गटांतच सत्ता वर्चस्वाची रस्सीखेच असताना भगवानराव इलग यांचे 6 सदस्य विजयी झाले तर लक्ष्मण आंधळे, विलास आंधळे यांचे 3 सदस्य विजयी झाले आहेत.

पिंप्रीलौकी आजमपूर ग्रामपंचायतीत आ. विखे गटाचे 10 सदस्य विजयी झाल्याने विखे गटाने सत्ता राखली आहे. येथे थोरात गटाचा अवघा एक सदस्य विजयी झाला आहे.

चिंचपूर येथे विखे गटाला मोठा धक्का बसला असून येथे थोरात गटाचे 8 सदस्य निवडून आल्याने येथे थोरात गटाची सत्ता आली असून विखे गटाचे 5 सदस्य निवडून आल्याने सत्ता गमावली आहे.

मनोली ग्रामपंचायतीत थोरात गटाला धक्का देत विखे गटाने 9 सदस्य निवडून आणत बहुमत मिळवले आहे. येथे थोरात गटाचे फक्त 2 सदस्य निवडून आले आहेत.

औरंगपूर ग्रामपंचायतीत विखे गटाने 5 सदस्य निवडून आणत सत्ता राखली आहे. येथे थोरात गटाचे 2 सदस्य विजयी झाले आहेत.

झरेकाठी ग्रामपंचायतीत थोरात गटाने 6 जागांवर विजय मिळवत सत्ता खेचून आणली असून विखे गटाचे अवघे 2 सदस्य निवडून आले आहेत.

शेडगाव ग्रामपंचायतीत थोरात गटाचे 6 उमेदवार विजयी झाल्याने बहुमत मिळवले आहे. येथे विखे गटाचे 2 सदस्य विजयी झाले आहेत.

शिबलापूर ग्रामपंचायत विखे गटाने आपल्याकडे राखत 7 सदस्य निवडून आणले आहेत. येथे थोरात गटाचे 4 सदस्य विजयी झाले आहेत.

पानोडी ग्रामपंचायतीत सत्तांतर झाले असून थोरात गटाचे 8 सदस्य निवडून आले असून विखे गटाला विजयी 3 सदस्यांवर समाधान मानावे लागले आहे.