पहिल्यांदा चोरी करण्यात यशस्वी परंतु दुसर्‍या चोरीचा प्रयत्न फसला

पहिल्यांदा चोरी करण्यात यशस्वी परंतु दुसर्‍या चोरीचा प्रयत्न फसला

आश्वी |वार्ताहर| Ashwi

संगमनेर तालुक्यातील चौधरवाडी शिवारात 15 ते 16 मे दरम्यान 35 हजार रुपये किमतीची अ‍ॅल्युमिनीयमची तार चोरून नेल्याची घटना ताजी असताना 21 मे रोजी पहाटे पुन्हा चोरटे तार चोरी करण्यासाठी त्याच ठिकाणी आले होते. मात्र पोलीस व ग्रामस्थांनी दाखवलेल्या प्रसंगवधानामुळे चोरटे गाडी व चोरीचा माल टाकून पळाल्याची घटना घडली असून या चोरट्यानां जेरबंद करण्याचे आवाहन आश्वी पोलिसांपुढे ठाकले आहे.

विभासकुमार महतो यांनी दुसर्‍यांदा दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, चौधरवाडी शिवारातील टॉवर क्रमांक 103 ते 104 ची 640 चौरस एम. एम. जाडीची व 15 हजार रुपये किमतीची अ‍ॅल्युमिनीयम तार 21 मे रोजी 3.30 वाजेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी चोरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे गुन्हा रजिस्टर नंबर 74/2021 नुसार भादंवी कलम 379, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एक अनोळखी गाडी भरधाव वेगाने गेल्यामुळे दुसर्‍यांदा अ‍ॅल्युमिनीयम तार चोरी करण्यासाठी चोरटे आल्याची चाहूल स्थानिक नागरिकांना लागली होती. त्यामुळे नागरिकांनी रस्त्यामध्ये दगड लावून आश्वी पोलिसांना चोरटे आल्याची माहिती दिली. यावेळी गस्तीवर असलेले पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळाकडे रवाना झाले. त्याचदरम्यान चोरटे भरधाव वेगाने आपले वाहन घेऊन येत असताना रस्त्यावर दगड लावलेले बघून थबकले. यावेळी नागरिकांनी गाडीचा पाठलाग सुरू केल्याने चोरट्यांनी गाडी मागे घेऊन मोकळ्या शेतातून गाडी पळवली पण नागंरटीत गाडी फसल्याने गाडी तेथेचं सोडून पाच ते सहा चोरटे अंधाराचा फायदा घेत पसार झाल्याची थरारक घटना घडली आहे.

दरम्यान यावेळी घटनास्थळावरून महिंद्रा बोलेरो (एम. एच. 06 बी. जी. 0660) हे वाहन पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधाकर मांडवकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार ए. डी. शिंदे करत असून या चोरट्यांना जेरबंद करण्याचे मोठे आवाहन आश्वी पोलिसांसमोर उभे ठाकले आहे. तर चोरट्यांबाबत धागेदोरे पोलिसाच्या हाती लागल्याची माहिती मिळाली आहे.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com