आश्वी बुद्रूकच्या स्मशानभूमीचे रुपडे पालटले

आश्वी बुद्रूकच्या स्मशानभूमीचे रुपडे पालटले

आश्वी |वार्ताहर| Ashwi

स्मशानभूमी म्हटलं की, उजाड व भयान वाटणारी जागा, काट्या-कुट्याचा रस्ता, सर्वदूर दुर्गधी, गुडघ्यापर्यत वाढलेले गवत, शोकाकूल कुटुंबिय, नात्या-गोत्यातील माणसे, मित्रपरिवार व ग्रामस्थांना बसण्यासाठीही जागा नसणे, मोडके-तोडके शेड व त्यातून आटोपले जाणारे अत्यंविधी, असेचं चित्र बहुदा स्मशानभूमीबाबत प्रत्येकाच्या डोळ्यासमोर उभे राहते.

त्यामुळे दुःखित अंतकरणाने आलेला व्यक्ती या ठिकाणी आल्यानंतर त्याला प्रसन्न वाटावे यासाठी युवा नेते विजयराव हिंगे यांच्या संकल्पना व प्रयत्नातून संगमनेर तालुक्यातील आश्वी बुद्रुक येथे स्वच्छ, सुंदर, हिरवाईने नटलेली व अंत्यविधीसाठीच्या सोयी-सुविधायुक्त अशी स्मशानभुमी उभी राहिली आहे.

आश्वी बुद्रुक ग्रामपंचायतीने विविध विकासकामे करत असताना विजयराव हिंगे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच सरपंच, उपसरपंच व सदस्य यांच्या नेतृत्वाखाली प्रामुख्याने प्रवरानदी तिरावर असलेल्या हिंदू स्मशानभूमीचा कायापालट करण्याचा निर्णय काही दिवसापूर्वी घेतला होता. त्यामुळे मोडकळीस आलेली पत्र्याच्या स्मशानभूमीच्या जागी काँक्रीटची स्मशानभूमी उभारणीच्या कामाला सुरवात करण्यात आली होती. एक एकर विस्तीर्ण अशा परिसराला संरक्षण भिंत व बंदिस्त जाळी बांधण्याचे काम करण्यात आले.

एकाच वेळी दोन जागेवर अंत्यसंस्कार करता येतील अशा दोन काँक्रीट स्मशानभूमीचे साचे उभे करण्यात आले. त्यामध्ये दोन नवीन जळक्या बसवण्यात आल्या आहे. स्मशानभूमी परिसरात रंगरंगोटी, अंत्यसंस्कारासाठी येणार्‍या नागरीकांना बसण्यासाठी मोठे शेड बांधण्यात आले आहे. जागोजागी विविध वृक्ष तसेच फुलाची रोपे लावण्यात आली आहे. जुन्या आडाला रंगरंगोटी करुन त्याचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. या परिसरात सर्वत्र ब्लॉक बसवण्यात आल्यामुळे चिखल अथवा पाणी साचल्याने डबके होणार नाही.

ठिकठिकाणी रोषणाईची सोय, स्मशानभूमी सुदंर हिरवळीमुळे एक हिरवागार बगीचाच दिसत असून सुबक व सुंदर पध्दतीने बांधण्यात आलेली कमान तसेच दोन्ही बाजूने केलेली फुलाची सजावट येणार्‍या जाणार्‍याचे लक्ष वेधून घेत आहे. धर्मशास्त्रानुसार सर्व सेवा सुविधा या ठिकाणी उभारण्यात आल्यामुळे परिसरातील गावातील नागरीक जाणीवपूर्वक येथील काम बघण्यासाठी येताना दिसत आहेत.

या स्मशानभूमीत किर्तन व प्रवचनासाठी सुंदर असा काँक्रीटचा छोटासा गोल मंडप उभारण्यात आला आहे. तसेच दशक्रिया विधी, आंघोळ, हातपाय धुणे, स्वच्छतागृह यासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. अंत्यविधी तसेच दशक्रिया विधीसाठी येणार्‍या नागरिकांच्या बसण्यासाठी स्टेडियम प्रमाणे रचना करण्यात आली आहे. त्यामुळे स्मशानभूमीत आपल्या माणसाचा इहलोकातून देवलोकात प्रवासाच्या थांब्यावर आल्यानतंर नातेवाईक, आप्तेष्ट, मित्रपरिवार, ग्रामस्थ यांना प्रसन्न वाटेल यांची पुर्ण काळजी सुशोभिकरणादरम्यान घेण्यात आली आहे. तसेच आम्रेश्वर महादेव मंदिरालगत स्मशानभूमी असल्याने परिसराला ज्योतिर्लिंगापेक्षा कमी महत्त्व नसल्याचे जुन्या जाणत्या लोकांचे म्हणणे आहे.

दरम्यान या स्मशानभूमीच्या कामासाठी माजी मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी 2515 अंतर्गत घाट बांधण्यासाठी 10 लाख रुपये तसेच सुशोभिकरणासाठी 7 लाख रुपये असा एकूण 17 लाख रुपये निधी दिला. केद्रिंय राज्यमंत्री ना. रामदास आठवले यांनी सुशोभिकरण, बंदिस्त जाळी व इतर कामासाठी 10 लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे.

स्वच्छ भारत मिशन अंतर्गत स्वच्छतागृह व इतर सुविधा उभारणीसाठी 3 लाख रुपये निधी देण्यात आला असून 15 व्या वित्त आयोगातून दोन नवीन जळक्यासाठी 12 लाख रुपये तसेच नवीन शेड बांधकामासाठी 3 लाख 79 हजार रुपये निधी उपलब्ध झाला होता. असा एकूण 45 लाख रुपये निधी या स्मशानभूमीच्या सुशोभिकरणासाठी खर्च करण्यात आल्यामुळे या स्मशानभुमीचे रुपडे पालटले आहे.

Related Stories

No stories found.
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com