अस्तगाव ग्रामपंचायतीची तब्बल ६२ लाखांची थकबाकी

थकबाकीदारांना लोकअदालतमार्फत नोटिसा; ३ दिवसांत सव्वातीन लाख वसूल
अस्तगाव ग्रामपंचायतीची तब्बल ६२ लाखांची थकबाकी

अस्तगाव (वार्ताहर)

ग्रामपचायतीच्या थकबाकीदारांना वसुलीच्या नोटिसा मिळाल्यानंतर अस्तगावला तीन दिवसात सव्वातीन लाख रुपये वसुल ग्रामपंचायतीला मिळाला आहे.

राहाता तालुक्यातील बहुतेक मध्ये कर वसुलीसाठी तडजोड व्हावी यासाठी माहिती दिली होती. तालुका प्रशासनाच्या आदेशाने ग्रामपंचायतीनी लोकअदालतमध्ये सर्व माहिती दाखल करण्याचे निर्देश दिल्यानंतर न्यायालयाने ग्रामपंचायतीची जुनी थकबाकी असणारांना नोटिसा काढण्याच्या सुचना केल्या होत्या. अस्तगाव ग्रामपंचातीची जुनी थकबाकी जवळपास ६० ते ६२ लाख रुपये इतकी आहे. ८ हजाराच्या पुढे थकबाकीदार असणाऱ्या अशा २६० जणांना नोटिसा काढल्या होत्या. त्यानुसार नोटिसा मिळाल्यानंतर अस्तगावला तीन दिवसात सव्वातीन लाख रुपये वसुल झाले आहेत. ज्यांनी २५ सप्टेंबरपर्यंत थकबाकी भरलेली असेल त्यांना न्यायालयात येण्याची गरज राहणार नाही. आज शनिवारीही सकाळी थकबाकी थकबाकीदार भरु शकतील.

या पध्दतीमुळे नाराजी- अॅड. लोंढे

दरम्यान या नोटिसा आल्याने या पध्दतीमुळे नाराजी- अॅड. लोंढे दरम्यान या नोटिसा आल्याने अनेकांची धांदल उडाली. याबाबत काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष अॅड. पंकज लोंढे यांनी नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, अस्तगाव ग्रामपंचायतीने ग्रामस्थांना घरपट्टी व पाणीपट्टी थकित वसुलीसाठी न्यायालयाचा आधार घेतला आहे. त्यांनी लोकन्यायालयात येवून तडजोड करणे कामी नोटिसा पाठविल्या आहेत. अचानक आलेल्या नोटिसीमुळे ग्रामस्थांनी व काँग्रेस पक्षाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती अॅड. लोंढे यांनी दिली. ग्रामपंचायतीने न्यायालयात जाण्यापूर्वी कोणतीही कल्पना दिली नाही. तसेच अडाणी ग्रामस्थांना अचानक न्यायालयाची नोटीस आल्याने ते घाबरुन गेले. वास्तविक करोनामुळे लोक अडचणीत आहेत. व्यवसाय व नोकरीवर अनेकांच्या गदा आलेली आहे. त्यामुळे ग्रामपंचायतीने मुदत व हप्ते पाडून देवुन ग्रामस्थांना कर भरण्याची संधी द्यावी, अशी मागणी अॅड. लोंढे यांनी केली आहे.

राहाता तालुक्यात ५० ग्रामपंचायती आहेत. त्यातील जुनी थकबाकी असेल तर लोकअदालतमध्ये तडजोड करुन रक्कम भरावी यासाठी नोटिसा न्यायालयाने काढल्या आहेत. सर्व ग्रामपंचातींना तशा सूचना आहेत. फार हार्ड अॅण्ड फास्ट नाही, लोकांनी हप्ते पाडून भरले तरी चालतील.

समर्थ शेवाळे, गटविकास अधिकारी

करोनाच्या काळात सर्वसामान्य जनता हैराण झाली. कोणताही शासकिय लाभ ज्यांना मिळालेला नाही. त्यांना नोटिसा आल्या आहेत. या स्वरुपाची वसुली ग्रामपंचायतीने करू नये. काही दिवस थांबावे. वाड्या व वस्त्यांचे आणि गावठाण यांचे कर वेगवेगळे असावेत.

ज्ञानदेव चोळके, अध्यक्ष अस्तगाव सोसायटी

सरकारने कर लावण्याचे धोरण बदलले पाहिजे. शेतात राहणारे, वस्त्यांवर राहणारे यांना पाणीपट्टीचा काय संबंध? आरोग्य व विजेचा लाभ होत नाही. कर घ्यायचे असतील तर ग्रामपंचायतीने सुविधा द्याव्यात.

अशोकराव नळे, माजी सरपंच

या नोटिशींमुळे ग्रामस्थ थकबाकी भरत आहेत. चांगली वसुली होत आहे. थकबाकी जुनी आहे. जे उपकर आहेत ते नियमाप्रमाणे आहेत. आरोग्य आणि वीज हे कर नियमाप्रमाणे आहेत. पाणीपट्टी केवळ नळ कनेक्शन असेल तरच घेतो. तीन दिवसांत सव्वातीन लाख रुपये वसुली झाली आहे. एकूण थकबाकी ६२ लाख आहे.

नवनाथ नळे, विद्यमान सरपंच

Related Stories

No stories found.