सत्ताधार्‍यांच्या मनमानीमुळे निवडणूक लढवावी लागली - आगलावे

सत्ताधार्‍यांच्या मनमानीमुळे निवडणूक लढवावी लागली - आगलावे

सावळीविहीर |वार्ताहर| Savalivihir

सत्ताधार्‍यांच्या मनमानीमुळे गोरगरिबांना वेठीस धरून गावचे गावपण वेशीला टांगून आम्हीच गावचे कर्तेधर्ते असल्याचा भास निर्माण करण्याच्या कारभाराला कंटाळून ही निवडणूक लढवण्याची वेळ आली असल्याचे महाविकास आघाडीचे सरपंच पदाचे उमेदवार अशोकराव आगलावे यांनी सांगितले.

गावविकास पॅनेलच्या प्रचार शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी राहाता तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अ‍ॅड.पंकज लोंढे, शिर्डी शहर अध्यक्ष सचिन चौगुले हजर होते.

अशोकराव आगलावे म्हणाले, मी सरपंच असताना विकास कामांचा डोंगर उभा केला. गत पंधरा वर्षांत यांना एकही काम करता आले नाही. मोठी पाणीपुरवठा योजना असताना गावाला प्यायला पाणी मिळत नाही. यांना सत्ता वाटून खायची सवय लागली असून गोरगरिब जनता भरडली जात आहे. येत्या निवडणुकीत मतदार या प्रवृत्तीला धडा दाखवून घरी बसवतील, असा विश्वास व्यक्त करून गावविकास पॅनेलचे नऊ उमेदवार विजयी करावे असे आवाहन त्यांनी केले.

काँग्रेसचे नेते प्रकाश पगारे यांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात, राष्ट्रवादी काँग्रेसचे साईबाबा संस्थानचे अध्यक्ष आशुतोष काळे यांच्या आदेशाने ही निवडणूक होत असल्याने शिवसेना, राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांचे मार्गदर्शन लाभत असल्याचे सांगतानाच जनसेवा पॅनेलचे पितळ उघडे करत जनसेवा मंडळावर सडकून टीका केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवसेनेचे दिनेश आरणे यांनी केले.कार्यक्रमास खजिनदार संजय पगारे, दिनेश आरणे, सतीश जपे, नाना मोरे, एकनाथ आरणे, दीपक खंडिझोड, सिद्धार्थ मोकळ, विलास आरणे, भारत आरणे, राहूल आगलावे, साहिल म्हस्के, प्रदीप वाघ, सिद्धार्थ बनकर, विनोद गायकवाड आदींसह कार्यकर्ते व मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com