अशोकनगर परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

पोलीस प्रशासनाच्या प्रभावी ग्रामसुरक्षा यंत्रणेमुळे प्रयत्न फसला
अशोकनगर परिसरात भुरट्या चोरांचा सुळसुळाट

वडाळा महादेव |वार्ताहर| Vadala Mahadev

श्रीरामपूर तालुक्यातील निपाणी वडगाव परिसरातील अशोकनगर तसेच परिसरात आठ ते दहा दिवसांपासून भुरट्या चोरांचा सुळसुळाट झाला असून रस्त्याच्या कडेला असलेल्या जोशीवस्ती येथे चार ते पाच अज्ञात भामट्यांनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरातील सदस्य जागे असल्याने चोरीचा प्रयत्न फसला.

घटनेचे गांभीर्य ओळखत श्री. साळवे यांनी घटनेची माहिती मोबाईलवरून कामगार पोलीस पाटील पती संजय गायधने यांना कळविली. पोलीस प्रशासनाच्यावतीने ग्राम सुरक्षा यंत्रणा अ‍ॅपवरून साधारण दोन हजार व्यक्तींना चोरीच्या संदर्भात मेसेज व्हायरल करण्यात आला. त्यामुळे ग्रामस्थ तसेच पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ घटनास्थळी भेट दिली.

दोन दिवसांपूर्वी चर्च परिसरात चार ते पाच अनोळखी व्यक्ती रात्री एक ते दीडच्या दरम्यान आढळून आल्याने येथील श्री. शेख यांनी घटनेची माहिती संजय गायधने यांना कळविली. यावेळीही ग्रामसुरक्षा यंत्रणाच्या माध्यमातून गावातील नागरिकांना तात्काळ सतर्क करण्यात आले. काही दिवसांपूर्वीच निवृत्त मुख्याध्यापकाच्या निवासस्थानी दरोडेखोरांनी हल्ला करत मोठा ऐवज लुटून नेल्याची घटना घडली आहे. ग्रामसुरक्षा यंत्रणेच्या माध्यमातून दोन शेळी चोरांना पलायन करावे लागले. परिसरात वारंवार भुरट्या चोर्‍या, गुन्हेगारीत वाढ झाल्याने प्रशासनाकडून रात्रीची गस्त सुरू करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.

निपाणी वडगाव, अशोकनगर परिसरात अशोक कारखाना तसेच महाविद्यालय, शाळा, कॉलेज, पॉलिटेकनिक कॉलेज असून मोठ्या संख्येने परीसरातील विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. काही गैरप्रकार होऊ नये यासाठी पोलीस प्रशासनाकडून शाळा कॉलेज भरतेवेळी तसेच शाळा सुटण्याच्या वेळेस परीसरात असणे आवश्यक आहे. आठवडे बाजारादरम्यान पोलीस चौकी पूर्ववत सुरू ठेवावी, यामुळे कुठलाही अनर्थ घडणार नाही.

- सोपानराव राऊत, संचालक, अशोक कारखाना

पोलीस प्रशासनाच्यावतीने ग्रामसुरक्षा यंत्रणा अ‍ॅपच्या माध्यमातून परिसरातील दोन हजार व्यक्ती संपर्कात असून घटनेची माहिती मिळताच तात्काळ सतर्कतेचा मेसेज व्हायरल करण्यात येतो. नागरिकांनी कुठलीही घटना घडल्यास तात्काळ यंत्रणेशी संपर्क साधावा.

- संजय गायधने, निपाणी वडगाव

ग्रामसुरक्षा यंत्रणा प्रभावी असून नागरिकांनी यंत्रणेमध्ये सहभाग घेऊन कुठलाही अनुचीत प्रकार घडत असल्यास तात्काळ पोलीस प्रशासन, ग्रामसुरक्षा यंत्रणेशी संपर्क करावा. जेणेकरून घटना घडताच पोलीस प्रशासनास नागरिकांच्या मदतीने उपाययोजना करता येतील.

- समाधान सुरवाडे, पोलीस उपनिरीक्षक

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com