अशोकनगर पोलीस चौकीचा वाद
सार्वमत

अशोकनगर पोलीस चौकीचा वाद

जिल्हा पोलीस अधिक्षकांनी लक्ष घालण्याची मागणी

Arvind Arkhade

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

मागील महिन्यापासून हरेगाव फाटा येथे उभारलेल्या अनधिकृत पोलीस चौकीबाबत वाद उपस्थित झालेला असताना निपाणी वडगाव ग्रामपंचायत हद्दीतील अधिकृत मंजुरी व पोलिसांना सजेचे ठिकाण असलेली अशोकनगर पोलीस चौकी पळवून हरेगाव फाटा येथे आणून त्या चौकीचे अशोकनगर पोलीस चौकी असे नामकरण केले. यामुळे पोलीस चौकीचा वाद आणखीच पेटला असल्यामुळे या वादात लक्ष घालावे, अशी मागणी भगतसिंग ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष कॉ. श्रीकृष्ण बडाख यांनी पोलीस अधीक्षक सिंग यांची भेट घेऊन केली.

या वादामुळे अशोकनगर येथील पोलीस चौकीस टाळे लागलेले असून सजेच्या ठिकाणी नेमणुका असलेल्या पोलिसांनी त्याठिकाणी भिरकूनही पाहिलेले नाही. गावची लोकसंख्या मोठी असल्याने सदर पोलीस चौकीस अधिकृत मंजुरी मिळालेली आहे. तरीही पोलिसांनी परस्पर निर्णय घेऊन तेथील सर्व टेबल, खुर्च्या उचलून हरेगाव फाटा येथील पोलीस चौकीत आणल्या आहेत. त्यामुळे ग्रामस्थांनी तीव्र विरोध करून ग्रामपंचायतीचा ठरावही मंजूर केलेला आहे.

सदर निवेदनाच्या अवलोकनानंतर पोलीस अधिक्षकांनी अप्पर पोलीस अधीक्षक दीपाली काळे यांना याबाबत विचारले असता त्यांनी पोलीस अधिक्षकांना सांगितले की, सदरच्या चौकीस मी परवानगी दिलेली नाही.

पोलीस अधिक्षकांनी सदरचे निवेदन स्वीकारून मी यावर माहिती घेतो असे सांगून जिल्हा पोलीस अधीक्षक रवाना झाले. याप्रकरणी आता पोलीस अधीक्षक काय कार्यवाही करतात याकडे अशोकनगरकरांचे लक्ष लागून आहे. याप्रश्नी निपाणी वडगाव ग्रामस्थ आंदोलनाच्या तयारीत आहेत.

Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com