अशोकनगर येथील करोनाबाधिताचा मृत्यू

नवीन 7 रुग्णांत 4 रॅपिड टेस्ट तर 3 खासगीतील अहवाल
अशोकनगर येथील करोनाबाधिताचा मृत्यू

श्रीरामपूर|प्रतिनिधी|Shrirampur

श्रीरामपूर तालुक्यातील अशोकनगर येथील करोनाबाधित असलेल्या 38 वर्षीय तरुणाचा नगर येथे उपचार सुरू असताना मृत्यू झाला. तर तालुक्यात काल नव्याने 7 रुग्णांची भर पडली आहे.

श्रीरामपुरात काल वैद्यकीय अधिकार्‍यांनी आंबेडकर वसतिगृहात 13 जणांची तपासणी केली असता 4 जण करोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर खासगी प्रयोगशाळेत तपासणी केलेल्या तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.

त्यामुळे तालुक्यातील करोना रुग्णांत 7 ने भर पडून आतापर्यंत श्रीरामपूर तालुक्यातील करोनाबाधितांचा आकडा 402 वर जाऊन पोहोचला आहे. तर करोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 11 वर जाऊन पोहोचली आहे.

काल पॉझिटिव्ह निघालेल्या रुग्णांमध्ये श्रीरामपूर तालुक्यातील उंबरगाव येथील 1, वॉर्ड नं. दोन मध्ये 1, अशोकनगर 1 व बेलापूर 1 अशा चार जणांसह खासगी रुग्णालयात ज्यांनी टेस्ट केल्या त्यातील 3 जणांचे करोनाबाधित अहवाल आले आहेत.

संत लूक हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन आजपर्यंत 258 जण बरे झाले आहेत. काल 18 जणांंनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आले. तर 51 जणांवर संत लूकमध्ये उपचार सुरु आहेत. तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसतीगृहातील कोविड सेंटरमध्ये 44 जण उपचार घेत आहेत.

श्रीरामपूर तालुक्यात आतापर्यंत 2168 जणांचे स्त्राव घेण्यात आले असून 402 रुग्ण करोनाबाधित आढळले असून 994 रुग्ण हे निगेटीव्ह झाले आहेत.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com