
श्रीरामपूर (प्रतिनिधी) -
तालुक्यातील अशोकनगर येथील सुरभी महिला बचत गटामार्फत अध्यक्षा सुमैय्या अजिम पठाण या चालवत असेलेलले स्वस्त धान्य दुकान
स्वस्त धान्य दुकान रद्द करण्यात आले होते. सदरच्या आदेशावर सुमैय्या पठाण यांनी जानेवारी 2020 मध्ये नाशिक पुरवठा उपआयुक्तांकडे पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल केला होता. सदरचा पुर्ननिरीक्षण अर्ज नामंजूर करण्यात येवून संबंधित स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करण्याचा आदेश नाशिकचे उपायुक्तांनी कायम ठेवला आहे.
संजय राऊत, भारत वैरागर व इतर ग्रामस्थांनी दि. 24 एप्रिल 2017 रोजी अशोकनगर येथील सुरभी महिला बचत गटामार्फत चालविणेत येणारे स्वस्त धान्य दुकानासंदर्भात तक्रारी अर्ज जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे केला होता. सदर तक्रारीची दखल घेत जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दुकान तपासणीचे आदेश श्रीरामपूर तहसीलदार यांना दिले होते. त्यावेळी तत्कालीन तहसीलदार सुभाष दळवी यांनी दुकान तपासणीकामी पुरवठा विभागाचे अव्वल कारकून श्री. पाटोळे, बेलापूरचे मंडल अधिकारी अशोक बनकर, निपाणीवडगावचे कामगार तलाठी श्रीमती आदिक यांची नियुक्ती केली होती. या तपासणी पथकाने स्वस्त धान्य दुकानाची तपासणी केली असता दुकानाचे संदर्भ रजिस्टर अद्यावत नसून त्यावर तहसीलदार यांची स्वाक्षरी नाही. कॅश मेमो पावतीवर कार्डधारकांच्या सह्या-अंगठे घेतलेले नाही. हिशोबाच्या कागदपत्रांत खाडाखोड केलेली आढळून आली. तसेच बील बुकावर परवाना क्रमांक, युनिट संख्या, कार्ड नंबर नमूद नाही. रेशनकार्ड धारकांच्या कार्डवर पावती प्रमाणे मालाच्या नोंदी झालेल्या नाहीत. पंचनामा रजिस्टरवर दक्षता समिती सदस्यांच्या सह्या नाहीत. तपासणीच्यावेळी वजन काटा पासिंग प्रमाणपत्र उपलब्ध करुन दिले नाही आदी दोष तपासणी पथकास आढळून आले होते. त्यानुसार बचत गटाचे अध्यक्षा सुमैय्या अजिम पठाण यांनी म्हणणे मांडणेकामी नोटीस बजावणेत आलेली होती.
याबाबत सौ.पठाण यांनी जिल्हा पुरवठा अधिकारर्यांकडे खुलाशात काही दोषांबाबत ठोस पुरावा सादर केलेला नसल्याने व काही दोष मान्य केल्यामुळे जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दि. 9 ऑक्टोबर 2017 रोजी स्वस्त धान्य दुकान पुढील आदेश होईपर्यंत निलंबीत करुन शंभर टक्के कार्ड तपासणी करणेचे आदेश तहसीलदार श्रीरामपूर यांना दिले होते. स्वस्त धान्य दुकानाचे सुमारे 1 हजार 114 कार्डापैकी 743 कार्डधारकांची तपासणी करण्यात आली. त्यात 524 कार्डधारकांची तक्रार, 364 कार्डधारकांना पावती मिळत नाही, 69 कार्डधारकांना धान्य मिळत नाही अशा विविध गंभीर स्वरुपाच्या तक्रारीत तथ्य आढळून आले. या सर्व बाबी विचारात घेऊन तहसीलदार श्री.दळवी यांनी जिल्हा पुरवठा अधिकारर्यांना दि. 30 ऑगस्ट 2018 रोजी अहवाल पाठविला होता.
त्यानुसार जिल्हा पुरवठा अधिकार्यांनी दि. 12 सप्टेंबर 2018 रोजी दुकानाचा परवाना रद्द केल्याचा आदेश पारीत केला. या आदेशाविरुद्ध सौ.पठाण यांनी दि. 18 जानेवारी 2020 रोजी नाशिक येथील उपआयुक्त (पुरवठा) यांचेकडे पुर्ननिरीक्षण अर्ज दाखल केला होता. त्यावर 30 एप्रिल 2020 रोजी सुनावणी होऊन अर्जदार व तक्रारदार संजय राऊत व भारत वैरागर यांना म्हणणे मांडणेसाठी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे वर्ग केला. त्यावर अर्जदार व तक्रारदार यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी यांचेकडे आपले म्हणणे लेखी स्वरुपात दिले. त्यानंतर अर्जदार यांनी वरील दोषानुसार कोणताही खुलासा व पुरावे न दिल्याने जिल्हा पुरवठा अधिकारी जयश्री माळी यांनी पूर्वीचाच आदेश कायम केला. त्याविरुद्ध पुन्हा सौ.पठाण यांनी नाशिक उपआयुक्तांकडे दाद मागीतली होती. त्यासाठी अॅड. बडवे यांचे मार्फत तोंडी युक्तीवाद आयुक्त यांचेसमोर मांडला होता. त्यावर आयुक्त यांनी जिल्हा पुरवठा अधिकारी अहमदनगर यांचेकडील संचिकेचे अवलोकन केले असता संजय राऊत व भारत वैरागर व ग्रामस्थांनी केलेल्या तक्रारी अर्जातील मुद्दे विचारात घेऊन अर्जदार यांचा पुर्ननिरीक्षण अर्ज नामंजूर करणेत येवून सुरभी महिला बचत गटामार्फत चालविणेत येणारे स्वस्त धान्य दुकानाचा परवाना रद्द करणेचा आदेश नाशिक विभागाचे पुरवठा उपआयुक्त अर्जुन चिखले यांनी दिला आहे.
या प्रकरणी अर्जदार यांचे वतीने अॅड. लक्ष्मीकांत बडवे व तक्रारदार यांचे वतीने अॅड. रमेश रसाळ यांनी काम पाहिले.