सभासदांनी लोकसेवा विकास आघाडीवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू - माजी आ. मुरकुटे

सभासदांनी लोकसेवा विकास आघाडीवर टाकलेला विश्वास सार्थ ठरवू - माजी आ. मुरकुटे

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

गेल्या पस्तीस वर्षातील कारभार आणि कारखान्याच्या भवितव्याचा विचार करुन सभासदांनी अशोक कारखान्याच्या निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडीवर विश्वास टाकला. येत्या पाच वर्षात सभासदाभिमुख कारभार करुन तसेच कारखान्याला प्रगतीपथावर नेत सभासदांचा विश्वास सार्थ ठरवू असे प्रतिपादन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.

अशोक कारखाना निवडणुकीत लोकसेवा विकास आघाडीच्या सर्व 21 उमेदवारांना विजयी केल्याबद्दल श्री. मुरकुटे यांनी कारखाना कार्यक्षेत्रातील गावात आभार दौर्‍याचे आयोजन केले होते. तीन दिवसांच्या या आभार दौर्‍यात जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साई संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, शेतकरी संघटनेचे सुभाष पटारे तसेच लोकसेवा विकास आघाडीचे विजयी उमेदवार सहभागी झाले होते. या दौर्‍याच्या निमित्ताने बोलताना श्री. मुरकुटे यांनी गावोगावच्या सभासदांसमोर मनोगत व्यक्त केले.

श्री. मुरकुटे म्हणाले की, निवडणूक प्रचारात आम्ही आमच्या पस्तीस वर्षातील कारभार आणि केलेली विकास कामे याचा लेखाजोखा सभासदांपुढे मांडला. तसेच भविष्यात कारखाना माध्यमातून कोणती कामे करावयची आहेत, याबाबतही सभासदांना माहिती दिली. विरोधकांचा भर मात्र केवळ टिकाटिपणीवर होता. त्यांच्याकडे विश्वासार्ह नेतृत्व नव्हते तसेच आमच्यावरील टिकेच्या पलिकडे सांगण्यासारखे काहिच नव्हते. या सगळ्याची तुलना आणि मुल्यमापन करुन सूज्ञ मतदारांनी आमच्या बाजूने कौल दिला.

आता निवडणुक संपली आहे. सभासदांनी काय तो निवाडा केला आहे. सभासदांनी आमच्यावर विश्वास टाकला तो सार्थ ठरविण्याची जबाबदारी आता आमाची आहे. नजिकच्या काळात कारखान्याची गाळप क्षमता वाढवून ऊस गाळपाचा प्रश्न मार्गी लावायचा आहे. आसवनी व इथेनॉल या दोन्ही प्रकल्पांची दैनंदिन क्षमता एक लाख लिटर्सपर्यंत वाढ करुन त्याव्दारे आर्थिक स्त्रोत वाढवून सभासदांना आर्थिक लाभ मिळवून द्यायचा आहे. इन्सुलेशन बॉयलर उभारुन स्पेंटवॉश जाळून त्यातून वीज निर्मिती करुन कारखाना प्रदुषणमुक्त करावयाचा मानस आहे. सभासदांचे हितरक्षण हा केंद्रबिंदू ठेवून कारभार केला जाईल आणि अशोकला भरभराटीच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला जाईल, अशी ग्वाही श्री. मुरकुटे यांनी दिली.

आभार दौर्‍यात श्री. ससाणे, श्री. गुजर, सुभाष पटारे यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार दौर्‍याप्रसंगी सभासद, कार्यकर्ते यांनी उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com