
पाचेगाव |वार्ताहर| Pachegav
16 जानेवारी रोजी होऊ घातलेल्या अशोक कारखान्याच्या 21 जागांसाठीच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी शेवटच्या दिवसअखेर कारेगाव गटातून तीन जागांकरिता सत्ताधारी व विरोधकांनी मिळून तब्बल 54 अर्ज दाखल केले असून पाच गटांमध्ये ही संख्या सर्वाधिक आहे. उमेदवारी निश्चितीचा दोन्ही बाजूंनी विचार सुरू असून कोणाच्या उमेदवारीमुळे स्थानिक ग्रामपंचायत, सहकारी सोसायटीवर आपल्या गटाचा कब्जा मिळणे शक्य होईल याचाही विचार केला जात आहे.
अशोक कारखाना निवडणुकीसाठी एकूण 271 जणांचे 277 अर्ज दाखल झाले आहेत. त्यात पाच गटांबरोबरच उत्पादक, बिगर उत्पादक, पणन संस्था, अनुसूचित जाती जमाती, महिला राखीव, इतर मागास प्रवर्ग, भटक्या विमुक्त जाती जमाती प्रवर्ग आदी राखीव जागांवरील उमेदवारी अर्जांचाही समावेश आहे.
कारेगाव गटात जवळपास 2669 मतदान आहे. त्यात पाचेगाव 465, पुनतगाव 247, कारेगाव 691, वांगी बुद्रुक 203, वांगी खुर्द 168, खिर्डी 253, गुजरवाडी 126 व भेर्डापूरमध्ये 516 मतदारसंख्या आहे. पाच गटातून मुरकुटे सत्ताधारी यांच्याकडे उमेदवारांचे कल पाहायला मिळत असला तरी विरोधकांनी देखील कंबर कसून एकास एक उमेदवारी देऊन निवडणुकीला सामोरे जाण्याची जय्यत तयारी करताना दिसत आहे.
निवडणुकीपूर्वी ऊस उत्पादक शेतकर्यांना निवडणूक बिनविरोध होऊन एकतर्फी सत्ता प्रस्थापित होईल, असा अंदाज सर्वांनीच व्यक्त केला होता. पण आता जशी जशी निवडणूक जवळ येत आहे, तसे चित्र वेगळे पाहायला मिळत आहे. सत्ताधारी व विरोधक या निवडणुकीत आपापल्या पध्दतीने मोर्चेबांधणी करून संभाव्य उमेदवारांची पडताळणी करताना दिसत आहेत.
सत्ताधार्यांना जरी पाच गट आपले बालेकिल्ले वाटत असले तरी विरोधक देखील यावेळी सत्तांतर घहवून आणण्यासाठी जोरदार प्रयत्न करताना दिसत आहेत. सत्ताधारी यांनी कार्यकर्त्यांना संचालक होण्यासाठी अर्ज दाखल करा, असे आवाहन केले होते. त्याअनुषंगाने सर्व गटातील सभासद, कार्यकर्ते यांनी अर्ज दाखल केले आहेत. अर्ज दाखल केलेल्या सर्वांनाच आज तरी खात्री वाटत आहे, की उमेदवारी आपल्यालाच मिळणार त्यामुळे सर्व अर्ज दाखल केलेले कार्यकर्ते आज रोजी गटात कामाला लागले आहेत.
पाचेगाव व पुनतगावात आज तरी सध्या बैठका जोर धरू पाहत आहेत. स्थानिक पातळीवर कोणाला सत्ताधारी गटातून उमेदवारी द्यायची आणि कोणाला यावेळेस टाळायचे याचा विचार होत आहे. तसे पहाता उमेदवारी देताना उमेदवार नुसता कारखाना संचालक होण्यासाठी नको आहे तर गावपातळीवर ग्रामपंचायत, सहकारी सोसायटीत आपला कब्जा मिळविण्यासाठी प्रयत्न करणार्यालाच उमेदवारी देण्यात येईल असे आज तरी स्पष्ट दिसत आहे. बैठकांदरम्यान कोणत्या उमेदवाराबद्दल नाराजी आहे हेदेखील यावेळी पाहण्यात येत आहे. कोणत्या उमेदवारांचे पारडे जड हे आज निश्चित सांगता येणार नाही असे वक्तव्य सत्ताधारी गटातील कार्यकर्ते करताना दिसत आहेत.
‘अशोक’च्या कार्यक्षेत्रात एकूण पाच गट आहेत. पढेगाव मधून 11 गावे येत असून एकूण 2228 मतदान आहे. कारेगाव गटात 6 गावे असून 2669 मतदान आहे.टाकळीभान गटात देखील 6 गावे असून 2615 मतदान आहे. वडाळा महादेव गटात पाच गावे येत असून 2188 मतदान आहे. तर उंदिरगाव गटात सर्वाधिक 13 गावे आहेत व मतदान मात्र सर्व गटापेक्षा कमी देखील आहे. कारेगाव गटात एकूण सहा गावे येत असून 2669 मतदान आहे.
या निवडणुकीत पढेगाव व वडाळा महादेव गटातून प्रत्येकी 36 अर्ज, उंदिरगाव गटातून 41 तर कारेगाव गटातून सर्वाधिक 54 अर्ज दाखल झाले आहेत. टाकळीभान गटातून मात्र सर्वात कमी 31 अर्ज दाखल झाले आहेत.
निवडणुकीत 4 जानेवारी अखेर चित्र स्पष्ट होऊन कोणाच्या पदरी उमेदवारी जाहीर होईल याकडे आज रोजी उमेदवारांबरोबर सभासदांना देखील उत्सुकता निर्माण होत आहे.
कारेगाव गटातील गावनिहाय अर्ज संख्या
कारेगाव गटातून कारेगावमधून सत्ताधार्यांकडून 10 तर विरोधकांकडून 4 असे एकूण 14 अर्ज दाखल केले आहेत. त्यानंतर वांगी बु, वांगी खु, खिर्डी व गुजरवाडी या चार गावांतून सत्ताधार्यांकडून 13 व विरोधकांकडून 2 असे एकूण 15 अर्ज दाखल झाले आहेत. भेर्डापूरमधून सत्ताधारी गटाकडून 12 तर विरोधकांकडून 3 असे एकूण 15 अर्ज दाखल झाले आहेत. त्यानंतर पाचेगावमधून सत्ताधारी गटातून 6 तर विरोधी गटाकडून 1 असे 7 अर्ज दाखल करण्यात आले आहेत. पुनतगावमधून फक्त सत्ताधारी गटाकडून 3 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. असे एकूण कारेगाव गटात सर्वाधिक 54 अर्ज सत्ताधारी व विरोधी गटाकडून करण्यात दाखल आले आहेत.