आदिकांच्या काळात अशोक कारखान्यात भ्रष्टाचार सिध्द झाल्याने सन 83 मध्ये प्रशासक नेमण्याची नामुष्की

लोकसेवा विकास आघाडीच्या प्रचाराची सांगता
आदिकांच्या काळात अशोक कारखान्यात भ्रष्टाचार सिध्द झाल्याने सन 83 मध्ये प्रशासक नेमण्याची नामुष्की

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

आदिकांच्या ताब्यात अशोक कारखाना असताना भ्रष्टाचार सिध्द झाल्याने सन 1983 मध्ये प्रशासक नेमण्याची नामुष्कीची वेळ आली. चाळीस वर्षाचा हा राजकीय ताळेबंद नव्या पिढीने जाणून घ्यावा, असे सांगून माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी लोकसेवा विकास आघाडीला विजयी करण्याचे आवाहन केले.

अशोक कारखाना निवडणुकीतील निपाणीवाडगाव, खोकर व टाकळीभान येथील लोकसेवा विकास आघाडीच्या सांगता सभेप्रसंगी ते बोलत होते.

माजी आ. मुरकुटे पुढे म्हणाले, आमच्या चाळीस वर्षाच्या राजकीय कारकिर्दीत अशोक कारखान्याच्या माध्यमातून डिस्टीलरी, इथेनॉल, वीजनिर्मिती प्रकल्प अशा नवीन प्रकल्पांची भर घातली. पॉलिटेक्निक, महाविद्यालय, आयटीआय, दोन इंग्लिश स्कूल असे शैक्षणिक संकुल उभारले. यातून रोजगार वाढला. अशोक बँकेमार्फत व्यापारी व ग्रामीण भागातील लोकांना अर्थसहाय्य केले. अशोक बंधारे प्रकल्पातून तालुक्यात बंधारे, साठवण तलाव यांचे जाळे निर्माण केले. प्रवरा व गोदावरी नदीवर बंधार्‍याची मालिका पूर्णत्वास नेवून शेती फुलविली. याउलट आदिकांच्या ताब्यातील हरेगाव कारखाना, सूतगिरणी, खरेदी-विक्री संघ, ग्राहक भांडार अशा वैभवशाली संस्थांचे दिवाळे निघाले.

शेतकरी संघटनेकडून कोणताही प्रकारचा अभ्यास न करता बिनबुडाचे आरोप करुन दिशाभूल केली जात आहे. कारखान्याचा तोटा 450 कोटी रुपये असल्याचा जावई शोध त्यांनी लावला. तोट्याबाबत तथ्य असेल तर तो सिध्द करावा. शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा यांच्यासारखी जबाबादार व्यक्ती कारखान्याच्या प्रचाराला येऊन ऐकीव माहिती सांगते हे योग्य नाही. अशोक कारखान्यावर साखर, अल्कोहोल, इथेनॉल वरील मालतारण तसेच वीज येणे बाकी पोटीचे मिळून 257 कोटीचे कर्ज आहे. इतरांपेक्षा ते सर्वात कमी असून कारखान्याकडे साखर साठा, कच्ची साखर साठा, अल्कोहोल, इथेनॉल साठा आणि वीज युनीटस विक्री उत्पादन हे कर्जाच्या प्रमाणात आहे.

मग 450 कोटीचा तोटा शेतकरी संघटनेने आणला कुठून? संघटनेकडून कारखान्याची दैनंदिन गाळप क्षमता 2850 टन असल्याचे सांगितले जाते. पण कारखान्याची गाळप क्षमता प्रतिदिन 4000 टन आहे. कारखान्याच्या भावाबाबतही अशीच दिशाभूल केली जाते. जिह्यातील कारखान्यांच्या गेल्या सात वर्षाची तुलनात्मक माहिती आम्ही जाहीर केली आहे. त्यात कारखान्याने चांगल्या कारखान्यांच्या बरोबरीने सातत्याने भाव दिला आहे. काही वेळा तर मुळा, ज्ञानेश्वर या कारखान्यांपेक्षा जास्त भाव दिलेला आहे. शेतकरी संघटनेने गेल्या दहा वर्षात कारखान्याबाबत अनेक तक्रारी केल्या. त्यांना अशोक कारखान्याशिवाय दुसरीकडे कुठेच दोष दिसत नाही. या तक्रारीबाबत साखर आयुक्त पातळीवरुन तपासणी झाली आहे. तक्रारीत तथ्य असते तर संचालक मंडळावर कारवाई झाली असती.

अविनाश आदिक यांच्या आरोपांबाबत बोलताना श्री. मुरकुटे म्हणाले की, ज्यांना ऑल इंडीया डिस्टीलर्स असोसिएशन ही देशपातळीवरची संस्था आहे, याबाबत माहिती नसेल तर त्याबाबत काय बोलावे? या संस्थेचे अध्यक्षपद स्व. शंकरराव काळे सारख्या ज्येष्ठाने भुषविले आहे आणि त्यांचेमुळेच पुढे हा मान मला मिळाला. मंत्रीपद वा राज्यस्तरीय पदांसाठी अविनाश यांचे पितामहच आमच्या मार्गात टांग आडवी घालायचे हे सर्वांना ठाऊक आहे. अशोकच्या वीज प्रकल्पाच्या आरोपाबाबातही आदिकांना पुरेशी माहिती नाही. वीज प्रकल्प कर्जमुक्त कधी होणार, हा आदिक यांचा प्रश्न तर अज्ञानमूलक आहे. कारण अशोकचा वीज प्रकल्प सन 2019 मध्येच कर्जमुक्त झाला आहे. आदिकांनी हरेगाव कारखाना ताब्यात घेतला होता, तो त्यांना चालविता आला नाही. ते आता अशोक चालवायला निघाले आहेत, अशी टिका श्री. मुरकुटे यांनी केली.

यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, माजी नगराध्यक्ष अनिल कांबळे, शिर्डी संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, अ‍ॅड. बाळासाहेब खंडागळे, मुरलीधर राऊत, अभिषेक खंडागळे, काशिनाथ गोराणे, विठ्ठलराव राऊत, भिमराज देवकर आदिंची भाषणे झाली.

सभेस लोकसेवा विकास आघाडीच्या उमेदवारांसह माजी नगरसेवक संजय छल्लारे, मुन्ना पठाण, ज्ञानदेव साळुंके, पोपटराव जाधव, माजी नगरसेविका मंजुश्री मुरकुटे, माजी सभापती प्रा. सुनिता गायकवाड, माजी सभापती वंदना राऊत यांच्यासह सभासद व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com