
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अशोक साखर कारखान्याचा ऊसतोडणी कार्यक्रम कोलमडला असून ऊसतोडणी लांबल्यामुळे शेतकर्यांचे नुकसान होत आहे. व्यवस्थापन कार्यक्षेत्राबाहेरून ऊस आणून सभासदांच्या पिकांचे नुकसान करत आहे. सभासदांच्या उसाच्या खोडक्या करू नयेत, अशा आशयाचे निवेदन पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदनाताई मुरकुटे यांनी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांना समक्ष भेटून दिले आहे.
सभापती डॉ. मुरकुटे यांनी पुणे येथील साखर संकुलात जाऊन राज्याचे साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची भेट घेतली व त्यांना निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, अशोक कारखान्याच्या कार्यक्षेत्रातील सभासदांची अकराव्या महिन्यातील ऊसतोडणी चालू असून खोडवा उसाची पिके अजूनही उभी आहेत. कारखाना स्थापनेपासून अशी परिस्थिती पहिल्यांदाच झाली आहे. शेतकर्यांनी काबाडकष्ट करून जपलेल्या ऊसपिकांची हेळसांड झाली आहे. उसाला तुरे फुटल्यामुळे उसाच्या वजनात घट होत आहे. अशोकच्या कार्यक्षेत्रातील ऊस तोडणीस प्राधान्य द्यावे, सभासदांच्या ऊस पिकांचे नुकसान टाळावे, अशी मागणी डॉ. मुरकुटे यांनी केली आहे.