अशोकने आठ दिवसात ऊस दर जाहीर न केल्यास शेतकरी कारखान्यावर उसाचे टिपरं आंदोलन

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा निवेदनाद्वारे इशारा
अशोकने आठ दिवसात ऊस दर जाहीर न केल्यास शेतकरी कारखान्यावर उसाचे टिपरं आंदोलन

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याचा गाळप हंगाम सुरु होवून 15 दिवस झाले तरी प्रशासनाने ऊस दर जाहीर केला नाही. दर आठ दिवसात जाहीर न केल्यास कुठलीही पूर्व सूचना न देता शेतकरी कारखान्यावर उसाचे टीपरं घेवून येतील, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कारखाना प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला.

निवेदनात पुढे म्हटले आहे की अशोकचा मागील वर्षीचा साखर उतारा 10.31 टक्के होता त्यानुसार तोडणी वाहतूक वजा जाता या वर्षीची एफ.आर. पी. रक्कम सरासरी 2359 रुपये एवढी होते, जी संघटनेला मान्य नाही. कारण अशोक सहकारी साखर कारखान्याने मागील वर्षी उसाचे गाळप करतांना जास्त प्रमाणात साखर मळीत घातल्यामुळे साखर उतार्‍यात घट झाली आहे.

एक टन उसापासून संगमनेरने 4.46 टक्के मळी तयार केली त्या तुलनेत अशोकने 5.49 टक्के मळी तयार केली. याचा अर्थ अशोकच्या मळीत साखरेचे प्रमाण जास्त आहे. त्यामुळे वाढीव तयार झालेल्या 10 लिटर इथेनॉल उत्पन्नाच्या 50 टक्के रक्कम म्हणजे प्रती टन 300 रुपये वाढीव ऊस दर मिळावा, अशी मागणी संघटनेने केली आहे. अशोकने मळीमध्ये अतिरिक्त साखर सोडल्यामुळे 2021-22 च्या हंगामात शेतकर्‍यांना FRP कमी मिळावा या हेतुनेच मळीमधे साखर जास्त सोडलेली आहे असा आरोपही केला आहे.

त्यामुळे 2021-22 च्या हंगामात 10.31 टक्के साखर उतार्‍याऐवजी 11.31 टक्के साखर उतार्‍यानुसार एफआरपी देण्यात यावी. संघटनेने तोडणी वाहतूक खर्चावरही आक्षेप घेतला असून मागील हंगामात 6,90,005 मे.टन ऊसाचे गाळप केले पैकी फक्त 10 टक्के ऊस कार्यक्षेत्राचे बाहेरील आहेे. कार्यक्षेत्रात सुमारे 10 लाख टन गळीतासाठी उपलब्ध होणार असून प्राधान्याने सभासद व कार्यक्षेत्रातील उसाचेच तोडणीचे नियोजन व्हावे. अन्यथा मोठा संघर्ष होईल, असा इशाराही संघटनेने दिला आहे.

या निवेदनावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र आबासाहेब भोसले, सुरेश पांडुरंग ताके, दत्तात्रय जगन्नाथ लिप्टे, गोविंद वाबळे, दिलीप गलांडे, ज्ञानदेव थोरात, राजेंद्र भांड, ईश्वर दरंदले, नामदेव येवले, संदीप गवारे, किशोर पाटील, दादासाहेब पटारे, रावसाहेब गलांडे, संजय नाईक, प्रकाश थोरात, जनार्दन बडाख, निलेश आदिक आदींसह कार्यकर्त्यांच्या सह्या आहेत.

Related Stories

No stories found.