
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 21 जागांच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी काल विरोधी गटाकडून पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांच्यासह दोन जणांचे तीन अर्ज दाखल झाले. तर 55 जणांनी 163 उमेदवारी अर्ज नेले आहेत. 17 डिसेंबर अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस असल्याचे पुढील दोन दिवसांत अर्ज दाखल करणारांची वाढणार आहे.
अशोक कारखान्याची निवडणूक जाहीर झाल्याने राजकीय वातावरण तापण्यास सुरुवात झाली आहे. माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या स्नुषा व पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी विरोधी गटाकडून उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर सत्ताधारी गटाचे कारखान्याचे संचालक पोपटराव बाबुराव जाधव यांनी सर्वसाधारण वडाळा महादेव गटातून 2 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
निवडणूक निमित्ताने सत्ताधारी गटाचे सर्वोसर्वा माजी आ. भानुदास मुरकुटे यांचेकडून उमेदवारांची चाचपणी सुरु आहे. तर विरोधकांनी मोर्चेबांधणी सुरु केली असून सर्व विरोधकांची वज्रमूठ बांधण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
दि. 17 डिसेंबर ही अर्ज दाखल करण्याची शेवटची तारीख आहे. 20 डिसेंबरला उमेदवारी अर्जाची छाननी केली जाणार आहे. 21 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत उमेदवारी अर्ज माघारीची मुदत आहे. दि. 16 जानेवारीला मतदान होवून 17 जानेवारीला मतमोजणी केली जाणार आहे.