‘अशोक’च्या ऊस उत्पादकांनी प्रसारीत व शिफारस केलेल्या वाणांचीच लागवड करावी - डॉ. गारकर

‘अशोक’च्या ऊस उत्पादकांनी प्रसारीत व शिफारस केलेल्या वाणांचीच लागवड करावी - डॉ. गारकर

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या ऊस उत्पादकांनी प्रसारीत व शिफारस केलेल्या ऊस जातींच्या वाणांचीच लागवड करावी. तसेच मान्यताप्राप्त अधिकृत बेणे मळ्यातूनच बियाणे आणून ऊस लागवड करावी, असे आवाहन महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस विशेषज्ज्ञ डॉ. रामदास गारकर यांनी केले.

पाडेगाव मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्राचे ऊस पैदासकार डॉ. रामदास गारकर यांचेसह संशोधन सहाय्यक अंकुश भोसले व माधव भुसे यांनी अशोक कारखाना कार्यक्षेत्रात वेगवेगळ्या ठिकाणी शेतावर जाऊन ऊस पिकाची नुकतीच पाहणी केली. कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांचे मार्गदर्शनाखाली ऊस विशेषज्ज्ञांशी व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे, संचालक विरेश गलांडे, रामभाऊ कसार, माजी संचालक भाऊसाहेब पटारे, कार्यकारी संचालक संतोष देवकर, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, ऊस विकास अधिकारी विजयकुमार धुमाळ, संकेत लासुरे, अभिषेक लबडे यांचेसमवेत नवीन ऊस जातीबाबत चर्चा करण्यात आली.

प्रगतशील शेतकरी नामदेव दुधाळ, भाऊसाहेब कोकणे, किशोर शिवरकर, अरुण पटारे, हारुण पठाण आदी शेतकर्‍यांचे शेतावर जाऊन ऊस पिकाची पाहणी करण्यात आली. पाडेगाव ऊस संशोधन केंद्राने निर्माण केलेला पीडीएन 15006 व व्हीएसआयचा कोव्हिएसआय 18121 हा आशादायक ऊस वाण शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणात वाढविलेला आहे. तसेच ऊस पिकाची पाहणी करीत असताना कार्यक्षेत्रातील काही शेतकर्‍यांच्या शेतावर कोएम 0261, को 62175 या अप्रसारीत उसाच्या जाती आढळून आल्या. पीडीएन 15006 हा वाण शेतकर्‍यांच्या पसंतीस उतरला आहे.

कोव्हिएसआय 18121 पीडीएन 15006 हा वाण महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे मध्यवर्ती ऊस संशोधन केंद्र, पाडेगाव येथे कोएम 0265 व को 94012 या दोन वाणाच्या संकरातून निर्माण केलेला असून या वाणांच्या सध्या वेगवेगळ्या चाचण्या चालू आहे. त्यामुळे सदर वाण अद्याप प्रसारीत केलेला नाही. सदर ऊसाचा रंग अंजिरी असून पाने रुंद व जमिनीकडे वाकलेली असतात. हा वाण मध्यम पक्वता गटातील असून 12 ते 14 महिन्यात गाळपास तयार होतो. शेतकर्‍यांनी ऊस लागवड करताना शिफारस केलेल्या ऊस जातीचे 9 ते 11 महिने वयाचे अधिकृत बेणे मळ्यातून तसेच संशोधन केंद्रावरुन आणावे. तसेच अप्रसारीत ऊस जातीची लागवड करु नये, असे आवाहन ऊस पैदासकार डॉ. रामदास गारकर यांनी केले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com