अशोक एफआरपीप्रमाणे रुपये 2455 प्रतिटनप्रमाणे दर देणार

उसाचा भाव हा कुणाच्या मर्जीप्रमाणे ठरविता येत नाही - माजी आ. मुरकुटे || किरकोळ वाद वगळता सभा खेळीमेळीत
अशोक एफआरपीप्रमाणे रुपये 2455 प्रतिटनप्रमाणे दर देणार

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

कारखान्याचा कारभार पाहताना व्यवहारास प्राधान्य द्यावे लागते, अन्यथा त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात. ऊसाचा भाव हा कोणाच्या मर्जीप्रमाणे ठरविता येत नाही. तर उत्पन्न व खर्चाचा हिशोब करून भाव द्यावा लागतो. अशोक कारखान्याने आजवर सातत्याने जिल्ह्यातील इतर कारखान्यांच्या बरोबरीने भाव दिला आहे. कारखाना 2021-22 च्या गळीत हंगामात एफआरपीप्रमाणे रुपये 2455 प्रतिटनप्रमाणे दर देणार आहे. यापूर्वी प्रतिटन रुपये 2400 अदा केले असून दिवाळीच्या पार्श्वभूमीवर उर्वरित प्रतिटन रुपये 55 हे लवकरच अदा करण्यात येतील, असे प्रतिपादन अशोक कारखान्याचे चेअरमन माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी केले.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 64 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षस्थानावरून श्री. मुरकुटे बोलत होते. सभेस जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, सचिन गुजर, बाबासाहेब दिघे, के.वाय. बनकर, कारखान्याचे व्हा. चेअरमन भाऊसाहेब उंडे, रावसाहेब थोरात, कोंडीराम उंडे, सुरेश गलांडे, सोपानराव राऊत, युवक नेते सिद्धार्थ मुरकुटे, लोकसेवा विकास आघाडीचे अध्यक्ष हिंमतराव धुमाळ, मंजुश्रीताई मुरकुटे, शितलताई गवारे, सुनीताताई गायकवाड आदींसह सभासद, संचालक मंडळाचे सदस्य उपस्थित होते. सभेत काही वक्त्यांच्या वक्तव्यामुळे काहीकाळ मुरकुटे समर्थक व विरोधक यांच्यात बाचाबाची झाली. तसेच काही काळ गोंधळही उडाला. त्यानंतर मात्र सभा सुरळीतपणे पार पडली. सभेतील सर्व विषय सर्वानुमते मंजूर करण्यात आले.

श्री. मुरकुटे म्हणाले, गेल्या हंगामात कारखान्याने उच्चांकी गळीत केले. अतिरिक्त उसामुळे ऊस तोडणी लांबली आणि त्याचा आर्थिक फटका ऊस उत्पादकांना बसला, हे लक्षात घेऊन व्यवस्थापनाने 16 एप्रिल ते 30 एप्रिल या काळात गाळप झालेल्या ऊसास प्रतिटन रुपये 50, मे महिन्यात गाळत झालेल्या उसास प्रतिटन रुपये 100 तर जून महिन्यात गाळप झालेल्या उसास प्रतिटन रुपये 200 याप्रमाणे ऊस उत्पादन घट अनुदान दिले आहे. तसेच शासनाकडूनही मे व जून महिन्यात गाळप झालेल्या उसास प्रतिटन रुपये 200 याप्रमाणे ऊस उत्पादन घट अनुदान मिळणार आहे. आरएसएफचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असून त्यावर निर्णय झालेला नसल्याने हा कारखान्याचा दोष नाही. आरोप करणारेच कार्यक्षेत्रातील शेतकर्‍यांना बाहेरच्या कारखान्यांना ऊस द्या, असे सांगत होते, असे श्री. मुरकुटे म्हणाले.

शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष अ‍ॅड्. अजित काळे म्हणाले की, जिथे सभासदांना त्रास होईल तिथे शेतकरी संघटना शेतकर्‍यांच्या बाजूने उभी राहील. केंद्र शासनाच्या निर्णयानुसार पहिला हप्ता एफआरपी प्रमाणे तर दुसरा हप्ता आरएसएफप्रमाणे मिळाला पाहिजे. ऊस तोडणीस विलंब झाल्याने शेतकर्‍यांना भूर्दंड सोसावा लागला. कार्यक्षेत्रात अतिरिक्त ऊस असताना बाहेरून ऊस आणल्याने वाहतुकीचा खर्च वाढल्याचा आरोप श्री. काळे यांनी केला. शेतकरी संघटनेचे बाळासाहेब पटारे म्हणाले की, शासनाने ठरविल्याप्रमाणे 15 ऑक्टोबरपर्यंत कारखाना सुरू करावा. कारखान्याने जास्तीत जास्त हार्वेस्टर आणून तोडणीचे नियोजन करावे. कारखान्याने एफआरपी प्रमाणे भाव दिला असला तरी भावात वाढ करून शेतकर्‍यांची दिवाळी गोड करावी.

यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जितेंद्र भोसले, अनिल औताडे, कॉ. श्रीधर आदिक, कार्लस साठे, अ‍ॅड्. सुभाष चौधरी, काशिनाथ गोराणे, रामदास पटारे आदींची भाषणे झाली.

यावेळी वेडू लक्ष्मण कसार, चंदा अण्णासाहेब राऊत, अशोक काशिनाथ मुसमाडे, गोरख बहिरुनाथ वाकडे, बशीर कासम शेख, संजय रामदास उंडे, परसराम पुंडलीक दारकुंडे, भास्कर सटवा मते, बाबासाहेब यशवंत कापसे विमल शहाराम कोकणे, बाळासाहेब कारभारी शिरोळे, रामदास भिमाजी नवले या सभासद ऊस उत्पादकांना मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लव शिंदे यांनी इतिवृत्त वाचन केले. कार्यकारी संचालक संतोष देवकर यांनी आभार मानले. प्रा. दिलीप खंडागळे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कार्यालय अधीक्षक विक्रांत भागवत, चिफ इंजिनिअर बाळासाहेब उंडे, शेतकी अधिकारी नारायण चौधरी, चिफ केमिस्ट भगवान निकम, चीफ अकाउंटंट मिलींद कुलकर्णी, डिस्टीलरी इनचार्ज बाबासाहेब हापसे, विश्वनाथ लवांडे, कृष्णकांत सोनटक्के, प्रमोद बिडकर, अण्णासाहेब वाकडे, रमेश आढाव आदींसह सभासद उपस्थित होते. कारखाना सभेसाठी पोलीस बंदोबस्त मागवला नसताना बंदोबस्त कसा आला असा प्रश्न भानुदास मुरकुटे यांनी केला असता त्यावर पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरुवडे व मुरकुटे यांच्यात हमरीतुमरी झाली. भाषा आरे-कारेपर्यंत गेली. पोलीस उपनिरीक्षकांनी हा वाद पोलीस निरीक्षकांपर्यंत नेला. पोलीस निरीक्षकांनी हा वाद त्यांच्या वरिष्ठ पातळीपर्यंत नेला.

माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे यांनी कारखान्यातील काटकसरीबद्दल चेअरमन मुरकुटे व संचालक मंडळाचे कौतुक केले. विक्रमी वीज उत्पादनाबद्दल त्यांनी संचालक मंडळाच्या अभिनंदनाचा ठराव मांडला. हिशोबाचे ऑडीट न करता सीएला अहवाल दिला का, असा प्रश्न पडतो. कच्च्या साखरेतून अधिक नफा होतो. मग कारखान्याच्या या साखर विक्रीतून झालेला नफा कुठे गेला, कर्जाच्या व्याजापोटी 42 कोटी द्यावे लागणार असल्याचे अहवालात म्हटले आहे. त्यावरून पुढच्या वर्षी सभासदांच्या उसाच्या भावातून ही रक्कम जाणार आहे. अहवालात चुकीचा तोडणी खर्च दाखविण्यात आला असून ऊस तोडणीत भेदभाव केल्याचा आरोप त्यांनी केला. यावेळी माजी सभापती डॉ. वंदना मुरकुटे व माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्यात चांगलीच शाब्दीक चकमक उडाली.

कारखाना सभेसाठी पोलीस बंदोबस्त मागवला नसताना बंदोबस्त कसा आला असा प्रश्न भानुदास मुरकुटे यांनी केला असता त्यावर पोलीस उपनिरीक्षक समाधान सुरुवडे व मुरकुटे यांच्यात हमरीतुमरी झाली. भाषा आरे-कारेपर्यंत गेली. पोलीस उपनिरीक्षकांनी हा वाद पोलीस निरीक्षकांपर्यंत नेला. पोलीस निरीक्षकांनी हा वाद त्यांच्या वरिष्ठ पातळीपर्यंत नेला.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com