टाकळीभानमध्ये ‘अशोक’ च्या निवडणुकीचे 'फ्लेक्स वॉर'

टाकळीभानमध्ये ‘अशोक’ च्या निवडणुकीचे 'फ्लेक्स वॉर'

टाकळीभान |वार्ताहर| Takalibhan

तालुक्याची कामधेनू असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणूक प्रचारात चांगलीच रंगत भरली असून टाकळीभान गावात फ्लेक्स वॉर सुरु झाले आहे. कार्यकर्त्यांकडून एकावर एक बोर्ड लावण्याच्या चढाओढीमुळे ग्रामस्थांच्या कट्ट्यावरील चर्चेला चांगलेच उधाण आले आहे.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या 16 जानेवारीला होणार्‍या संचालक मंडळाच्या निवडणूक प्रचाराने हवा चांगलीच गरम झाली आहे. निवडणूक प्रचारात लोकसेवा मंडळ व शेतकरी संघटनेत आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. टाकळीभान येथील लोकसेवा मंडळाकडुन दोन उमेदवार तर शेतकरी संघटनेकडुन एक उमेदवार निवडणूक रिंगणात आहे. अशोक उद्योग समुहाचे सुत्रधार माजी आ. भानुदास मुरकुटे यांचा हा गट असल्याने तो नेहमीच प्रतिष्ठेचा राहीलेला आहे.

लोकसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी अर्ज माघारीच्या आदल्या दिवशीच प्रचाराचा नारळ वाढवून श्रीरामपूर-नेवासा रोडवडील ग्रामपंचायतीच्या शिवपार्वती शॉपिंग सेंटरमध्ये संपर्क कार्यालयही सुरु करून या कार्यालयाला लोकसेवा मंडळाचा फलकही लावण्यात आला. मात्र याच फलकापासून काही अंतरावर शेतकरी संघटनेने वीजेच्या खांबावर आपला फलक लावला. लोकसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी या फलकावर आक्षेप घेतला. मात्र आक्षेप घेऊनही या कार्यालयापुढील फलक हटवला जात नसल्याने लोकसेवा मंडळाच्या कार्यकर्त्यांनी शेतकरी संघटनेच्या फलकासमोर दोन ते तीन फुट अंतरावर लोकसेवा मंडाळाचा फलक लावून शेतकरी संघटनेवर कडी केली आहे.

लोकसेवा मंडळाच्या कार्यालयासमोर लावलेल्या शेतकरी संघटनेच्या फलकाची सकाळच्या वेळी कट्ट्यावर चांगलीच चर्चा रंगली. मात्र दुपारनंतर लोकसेवा मंडळाने कडी करुन शेतकरी संघटनेच्या फलकापुढेच लावलेल्या फलकाची खमंग चर्चा सुरु होती. काहीही असले तरी कट्ट्यावर या फ्लेक्स वॉरने सामान्यांचा टाईमपास होत आहे.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com