‘अशोक’ वर सलग सातव्यांदा मुरकुटे ‘राज’!

विरोधी गटाचे सर्व उमेदवार पराभूत
‘अशोक’ वर सलग सातव्यांदा मुरकुटे ‘राज’!

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत माजी आ. भानुदास मुरकुटे यांच्या नेतृत्वाखालील लोकसेवा विकास मंडळाने सर्वच्या सर्व 21 जागा जिंकून सलग सातव्यांदा कारखान्याची एकहाती सत्ता अबाधित ठेवण्यात यश मिळविले. निवडणुकीत विरोधी शेतकरी संघटनेचे अ‍ॅड. अजित काळे व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अविनाश आदिक यांच्या नेतृत्वाखालील शेतकरी संघटनेच्या सर्व उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले. सुमारे दीड ते दोन हजाराच्या मताधिक्क्याने मुरकुटे यांच्यासह त्यांच्या उमेदवारांनी विरोधकांवर मात केली.

काल सकाळी 9 वाजता गुजराती मंगल कार्यालयात मतमोजणी सुरु झाली. सर्वप्रथम ‘ब’ वर्ग सोसायटी मतदार संघाचा निकाल जाहीर झाला. मुरकुटे गटाचे उमेदवार व विद्यमान संचालक सोपान पुंजाजी राऊत 38 मताधिक्क्याने विजयी झाले. सोपान राऊत यांना 45 मते मिळाली. तर विरोधी शेतकरी संघटनेचे उमेदवार प्रकाश जाधव यांना अवघे 5 मते मिळली.

निवडणुकीतील इतर मतदार संघाचा निकाल पुढीलप्रमाणे- भटक्या विमुक्त जाती मतदार संघ- योगेश भाऊसाहेब विटनोर 6260 (मुरकुटे) विजयी, प्रविण रामचंद्र देवकर 4572 (शेतकरी संघटना) 111 अवैध मते. इतर मागास प्रवर्ग मतदार संघ- अमोल बाबासाहेब कोकणे 6391 (मुरकुटे) विजयी, नितीन रामदास पटारे 4448 (शेतकरी संघटना)103 मते अवैध. महिला राखीव मतदार संघ- शितल आबासाहेब गवारे 6587 (मुरकुटे) विजयी, शांताबाई भगिरथ जाधव 4310 (शेतकरी संघटना), हिराबाई ज्ञानदेव साळुंके 6223 (मुरकुटे) विजयी, अर्चना संजय पानसरे 4414 (शेतकरी संघटना), 126 अवैध. अनु. जाती/अनु. जमाती मतदार संघ- यशवंत दिनकर रणनवरे 6624 (मुरकुटे) विजयी, कार्लस कचरु साठे 4211 (शेतकरी संघटना) 112 अवैध.

सर्वसाधारण मतदार संघ-

पढेगाव गट- रावसाहेब हरी थोरात 6410 (मुरकुटे) विजयी, विलास इंद्रनाथ थोरात 4438 (शेतकरी संघटना), हिम्मतराव माधवराव धुमाळ 6253 (मुरकुटे) विजयी, यशवंत गोविंदराव बनकर 6157 (मुरकुटे) विजयी, जितेंद्र आबासाहेब भोसले 4450 (शेतकरी संघटना), दत्तात्रय जगन्नाथ लिप्टे 4033 (शेतकरी संघटना) 185 अवैध.

कारेगाव गट - भाऊसाहेब धोंडीराम उंडे 6751 (मुरकुटे) विजयी, अरूण गंगाधर कवडे 4120 (शेतकरी संघटना), युवराज भाऊसाहेब जगताप 4194 (शेतकरी संघटना), प्रफुल्ल बाळासाहेब दांगट 6381 (मुरकुटे) विजयी, दिलीप शिवाजी पवार 4137 (शेतकरी संघटना), ज्ञानेश्वर भिकाजी शिंदे 6306 (मुरकुटे) विजयी 182 अवैध.

टाकळीभान गट- विष्णूपंत नाथू खंडागळे 4123 (शेतकरी संघटना), खंडेराव निवृत्ती पटारे 4177 (शेतकरी संघटना), ज्ञानदेव सोपान पटारे 6129 (मुरकुटे) विजयी, भानुदास काशिनाथ मुरकुटे 6405 (मुरकुटे) विजयी, डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे 5229 (शेतकरी संघटना) पुंजाहरी तुकाराम शिंदे 5719 (मुरकुटे) विजयी, 196 अवैध.

वडाळा महादेव गट- अर्चना संजीव उंडे 4337 (शेतकरी संघटना), कोंडीराम बाबाजी उंडे 6586 (मुरकुटे) विजयी, रामभाऊ तुळशीराम कसार 6345 (मुरकुटे) विजयी, ज्ञानेश्वर बाबासाहेब काळे 6326 (मुरकुटे) विजयी, नानासाहेब लक्ष्मण गवारे 4285 (शेतकरी संघटना), शरद निवृत्ती पवार 4076 (शेतकरी संघटना) 148 अवैध.

उंदिरगाव गट - निलेश सुरेश आदिक 4363 (शेतकरी संघटना), बाबासाहेब कडू आदिक 6449 (मुरकुटे) विजयी, अनिल प्रभाकर औताडे 4220 (शेतकरी संघटना), विरेश भाऊसाहेब गलांडे 6431 (मुरकुटे) विजयी, आदिनाथ निवृत्ती झुराळे 6139 (मुरकुटे) विजयी, शिवाजी अप्पासाहेब शेजुळ 4215 (शेतकरी संघटना) 188 अवैध.

काल दिवसभर भानुदास मुरकुटे मतमोजणी केंद्रावर ठाण मांडून बसले होते. पंचायत समिती सभापती डॉ. वंदना मुरकुटे याही बराच वेळ बसून होत्या. मात्र या निवडणुकीत शेतकरी संघटनेचे नेतृत्व करणारे प्रमुख अ‍ॅड. अजित काळे व अविनाश आदिक हे मतमोजणी केंद्राकडे फिरकले देखील नाही. त्यामुळे शेतकरी संघटनेच्या उमेदवारांनी नाराजी व्यक्त केली. या मतमोजणी दरम्यान काल श्रीनिवास बिहाणी, संजय छल्लारे, निरज सिध्दार्थ मुरकुटे यांच्यासह अन्य कार्यकर्ते ठाण मांडून बसले होते.

पहिला निकाल जाहीर होताच मुरकुटे समर्थक कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत थत्ते मैदानावर एकच जल्लोष केला. त्यांतर जसजसा निकाल जाहीर होत होता तसतसा जल्लोष वाढत गेला. या निवडणुकीत सर्वाधिक 6751 मते कारेगाव गटातून भाऊसाहेब कोंडीराम उंडे यांना मिळाली. पहिल्या काही तासातच ‘ब’ वर्ग सोसायटी, अनुसुचित जमाती, इतरमागास प्रवर्ग व भटक्या विमुक्त जाती या वर्गाचे निकाल लागले. मात्र सर्वसाधारण सर्वच गटातील मतमोजणीला उशीर लागला. जसजसे निकाल घोषित केले जात होते. तसतसा कार्यकर्त्यांचा जल्लोष वाढत गेला. थत्ते मैदानावर तर गुलालाचा थरच जमा झाला होता. मेनरोडवरील अशोक कारखान्याच्या कार्यालयासमोर फटाक्यांची अतिषबाजी करुन जल्लोष साजरा करण्यात आला.

निवडणुकीचे सर्व निकाल घोषित झाल्यानंतर माजी आ. भानुदास मुरकुटे यांनी निवडणूक निर्णय अधिकारी, मतमोजकी कर्मचारी, बंदोबस्तास असलेल्या पोलिस अधिकारी व कर्मचारी यांचे आभार मानले. यावेळी जिल्हा बँकेचे संचालक करण ससाणे, साईबाबा संस्थानचे विश्वस्त सचिन गुजर, श्रीनिवास बिहाणी, अनिल कांबळे, संजय छल्लारे, संजय फंड, यांच्यासह माजी नगरसेवक उपस्थित होते. अशोक कारखाना निवडणुकीच्या इतिहासात काल पहिल्यांदा निवडणुकीच्या मतमोजणीत शांतता दिसून आली.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून संगमनेर येथील सहायक उपनिबंधक गणेश पुरी यांनी काम पाहिले. त्यांना सहायक निवडणूक निर्णय अधिकारी एस. पी. कांदळकर, क्षेत्रीय अधिकारी तथा राहाता येथील सहायक निबंधक आर. एम. खेडकर, श्रीरामपूर येथील सहायक निबंधक श्री. क्षत्रीय, कोपरगावचे निवृत्त सहायक निबंधक आर. एल. त्रिभुवन, मुख्य लिपिक श्री. खंडेराय, डी. बी. वाकचौरे व श्री. पाटील यांनी सहकार्य केले. मतमोजणीच्या ठिकाणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरिक्षक़ संजय सानप यांच्या मार्गसर्शनाखाली पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

गेली 35 वर्षापासून अशोक सहकारी साखर कारखान्याचे नेतृत्व करताना अनेक विकासात्मक कामे करता आली. सभासदांचे हित लक्षात घेवून आतापर्यंत कामे करत आल्यामुळे सभासदांनी पुन्हा एकदा विश्वास दाखवत पुन्हा एकहाती सत्ता दिली. उमेदवारी मिळविण्यासाठी आमच्याकडून इच्छुकांची मोठी गर्दी होती. उमेदवारी देताना काहीजण नाराज झाले. त्या नाराजीचा फटका विजयी उमेदवारांचे मताधिक्य कमी होण्यात झाले.

- माजी आ. भानुदास मुरकुटे

सुनेने दिली कडवी झुंज..

अशोक कारखान्याच्या निवडणुकीत टाकळीभान गटातून पंचायत समितीच्या सभापती डॉ. वंदना ज्ञानेश्वर मुरकुटे यांनी प्रचारात आघाडी घेत सासर्‍यांविरुध्द कडवी झुंज दिली. यानिवडणुकीत वंदना मुरकटे यांना 5229 मते पडली त्यांच्या विरोधी असलेले पुंजाहरी शिंदे यांना 5719 मते पडल्याने वंदना मुरकुटे यांचा केवळ 490 मतांनी पराभव झाला. अन्य उमेदवारांना सुमारे 2000 मतांचा लिड होता तर वंदना मुरकुटे यांच्यात केवळ 490 मतांची आघाडी माजी आ. मुरकुटे यांंच्या गटाच्या उमेदवारास घेता आली.

अशोक सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत सभासदांनी दिलेला कौल मान्य आहे. यापुढेही सभासद व सर्वसामान्यााच्या हितासाठी काम करत राहणार. धनशक्तीच्या जोरावर त्यांनी निवडणूक लढवली असली तरी आमच्या सर्व उमेदवारांनी लढत दिली. धनशक्तीचा हा विजय आहे.

- डॉ. वंदना मुरकुटे, सभापती, पंचायत समिती

अशोक सहकारी साखर कारखान्यात सत्तांतर झाले पाहिजे. सभासद व शेतकर्‍यांना न्याय मिळाला पाहिजे म्हणून शेतकरी संघटनेने निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला. तो आम्हाला मान्यही झाला. शेतकरी संघटनेच्या बाजुने आम्ही प्रचारात उडी घेतली व शेतकरी संघटनेचे उमेदवार निवडून यावे म्हणून प्रयत्नही केले. पंरंतु या निवडणुकीत सभाससदांनी जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. विजयी संचालक मंडळ शेतकर्‍यांना न्याय देतील. त्यांच्या कारकिर्दीस शुभेच्छा!

- अविनाश आदिक, प्रदेश सचिव, राष्ट्रवादी काँग्रेस

शेतकरी संघटनेच्या माध्यमातून शेतकर्‍यांच्या हिताचे निर्णय झाले पाहिजे व त्यांचेवर अन्याय होवू नये म्हणून नेहमीच अशोक कारखाना व्यवस्थापनाविरुध्द लढत आलो. त्यांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. या निवडणुकीत सभासदांनी आम्हाला जो कौल दिला तो आम्हाला मान्य आहे. यापुढेही शेतकर्‍यांच्या हितासाठी आम्ही लढत राहणार.

- अ‍ॅड. अजित काळे, शेतकरी संघटन

फेरमतमोजणीचे अर्ज फेटाळले

अशोक कारखान्याच्या निवडणुकीत टाकळीभान गटातून निवडणूक लढविणारे विष्णूपंत खंडागळे व डॉ. वंदना मुरकुटे यांनी फेरमतमोजणी व्हावी म्हणून निवडणूक निर्णय अधिकार्‍यांकडे अर्ज दाखल केले होते. परंतु निवडणूक निर्णय अधिकारी गणेश पुरी यांनी फेरमतमोजणी होणार नाही असे सांगून दोघांचेही अर्ज फेटाळले.

Related Stories

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com