
श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर तिर्थक्षेत्री जाण्यासाठी श्रीरामपूर आगारातून 25 गाड्या सोडण्यात येणार असून त्यामुळे सहा दिवस ग्रामीण भागातील एका ठिकाणच्या बसेस रद्द करण्यात आल्या असल्याची माहिती श्रीरामपूर आगाराचे प्रमुख श्री. शिवदे यांनी दिली.
श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पांडूरंगाच्या दर्शनासाठी दररोज सकाळी एक व संध्याकाळी एक अशा दोन गाड्या नित्यनियमाने सुरू आहेत. तसेच आषाढी एकादशीनिमित्त रविवार दि. 10 जुलै 2022 रोजी श्रीरामपूर आगारातून 25 स्वतंत्र एसटी बसेस खास पंढरपूर यात्रेसाठी सोडण्यात येणार आहे. तसे नियोजनही या श्रीरामपूर बस आगारातून करण्यात आले आहे. श्रीरामपूर आगारात एकूण 46 एस. टी. बसेस असून पैकी 25 बसेस पंढरपूरसाठी सोडण्यात येणार असल्याने या आगारात बसची संख्या कमी होणार आहे.
त्यासाठी ग्रामीण भागात काही ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या गाड्या सहा दिवस बंद राहणार आहेत. तसे परिपत्रक श्रीरामपूर आगाराच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आले आहे. तसेच कंट्रोल रुममधून वारंवार सूचना देण्यात येत आहेत. कोणकोणत्या तसे कुठे कुठे जाणार्या बसेस सहा दिवस बंद राहणार आहेत याबाबतची सविस्तर माहिती कंट्रोलर देत आहेत. तसेच कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही याचीही काळजी घेण्यात येणार आहे.
शालेय, तसेच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची अडचण होणार नाही अशी व्यवस्थाही करण्यात येणार असल्याची माहिती श्री. शिवदे यांनी दिली. ज्या गावात बस बंद राहतील त्या गावातील ग्रामस्थांनी श्रीरामपूर आगारास सहकार्य करावे,असे आवाहनही श्री. शिवदे यांनी केले आहे.