
कोपरगाव |प्रतिनिधी| Kopargav
राज्यातील आशा सेविकांचे महाविकास आघाडी शासनाच्या काळातील थकीत मानधन व चार महिन्यांचे वेतन तात्काळ अदा व्हावे, अशी मागणी भाजपाच्या प्रदेश सचिव स्नेहलता कोल्हे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
त्यांनी याबाबत प्रसिध्दीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, राज्यात मार्च 2020 पासून करोना महामारी सुरू होती त्याचा प्रादूर्भाव जानेवारी 2022 पर्यंत मोठ्या प्रमाणात होता. करोना महामारीमुळे सर्वत्र लॉकडाऊनची परिस्थिती निर्माण झालेली होती. या कठीण काळात आशा सेविकांनी आपला जीव धोक्यात घालून रुग्ण शोधण्याचे काम केले. त्यातून अनेक आशासेविकांना करोनाची बाधा झाली. त्यांच्या कुटुंबियांनाही त्रास सहन करावा लागला. त्यातून अनेकांच्या घरातील व्यक्ती मयत झाल्या आहेत.
अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत काम करून देखील मागील सरकारने त्यांना मानधन दिलेले नाही. यावरच त्यांच्या कुटुंबाची उपजिवीका अवलंबून असल्यामुळे अनेक भगिनींपुढे आपला प्रपंच कसा चालवावा हा प्रश्न उभा राहिला आहे. अशीच परिस्थिती आशा सेविकांच्या बाबतीत झालेली असून त्यांनाही करोना काळातील मानधन मागील सरकारने दिलेले नाही. तेव्हा थकीत असलेले मानधन व 4 महिन्यांपासूनचे वेतन तातडीने देण्याबाबत कार्यवाही करण्यात यावी,अशी मागणी स्नेहलता कोल्हे यांनी केली आहे.