संग्रहीत छायाचित्र
संग्रहीत छायाचित्र
सार्वमत

आशा सेविकांची सुरक्षा धोक्यात

काम बंद आंदोलन करणार; नेवासा तालुका संघटनेचा इशारा

Arvind Arkhade

नेवासा|तालुका वार्ताहर|Newasa

गावोगावच्या कोव्हिड 19 दक्षता समितीच्या सदस्यांच्या चुगल्या करण्यामुळे प्रत्येक गावात बाहेरून येणार्‍या लोकांच्या रोषास आशा सेविकांना सामोरे जावे लागत आहे परिणामी आशा सेविकांची सुरक्षा धोक्यात आल्याने नेवासा तालुका आशा कर्मचारी संघटनेने काम बंद आंदोलनाचा इशारा दिला आहे.

याबाबत आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांना काम बंद आंदोलन करण्याबाबत इशारा निवेदन दिले. करोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर गावोगावच्या आशा सेविका मोठ्या जबाबदारीने काम करताना दिसत आहेत. या कर्मचार्‍यांच्या जीवावरच शासकीय आकडेवारी व कार्य शेवटपर्यंत जात आहे. प्रत्येक गावांमध्ये ग्रामपंचायत पातळीवर कोव्हिड-19 दक्षता समित्या बनवल्या आहेत.

या समितीवर गावोगावचे पुढारी वर्ग आहे. प्रत्येक गावात नवीन येणार्‍या नागरिकाला क्वारंटाईन करणे गरजेचे आहे. परंतु अनेक जण क्वारंटाईन होण्यास राजी नसतात. परिणामी आशा सेविका या नागरिकांची नावे दक्षता समितीला कळवितात. व त्यानुसार समितीने या सर्वांना दक्षता म्हणून क्वारंटाईन करणे गरजेचे असते.

प्रत्यक्षात समितीचे सदस्य असलेले गावोगावचे पुढारी क्वारंटाईन होणार्‍या व्यक्तीला तुमचे नाव सदरच्या आशा सेविकेने सांगितले अशा चुगल्या करतात. त्यामुळे सदरच्या बाहेरगावाहून आलेल्या व्यक्ती आशा सेविकांना शिवीगाळ करतात. त्यांच्याशी भांडणे करतात. या पार्श्वभूमीवर आशा सेविकांची सुरक्षा धोक्यात आलेली आहे.

कॉ. अ‍ॅड. बन्सी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने कामबंद आंदोलनाचा इशारा देणारे निवेदन तहसीलदार रुपेश कुमार सुराणा यांना देण्यात आले. निवेदनावर जिल्हा संघटना सदस्य मंगल नगरे, आशा सेविका मीना कदम, मुक्ता काळे, वनिता जगधने, सुवर्णा शेंडे, अलका तांबे, शहाबाई राऊत, अंजना खलाटे यांच्या सह्या आहेत.

तालुक्यातील दहा-बारा गावांमध्ये आशा सेविकांना भांडणांना सामोरे जावे लागले. त्यातून अशा सेविकांच्या घरातही भांडणे होत आहेत. नेवासा तालुक्यात 280 अशा सेविका व 16 गटप्रवर्तक करोना योद्धा म्हणून काम करीत आहेत.

- मंगल नगरे, तालुका अध्यक्ष, आशा कर्मचारी संघटना

Deshdoot
www.deshdoot.com