आशासेविका, गट प्रवर्तकांचे लाक्षणिक उपोषण

विविध मागण्यांसाठी पाथर्डीत केले काम बंद आंदोलन
आशासेविका, गट प्रवर्तकांचे लाक्षणिक उपोषण

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

तालुक्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांनी विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन करत शहरातील वसंतराव नाईक चौकात लाक्षणिक उपोषण करून आंदोलन केले. यावेळी मोठ्या संख्येने आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक आंदोलनात सहभागी झाले होते.

आयटक संलग्न असलेल्या जिल्हा आशा कर्मचारी संघटनेने आंदोलनात सक्रीय भाग घेत मागण्याचे निवेदन प्रशासनास दिले. शहर विभागातील आशा स्वयंसेविकाना प्रतिदिन 300 रुपये तर ग्रामीण भागातील स्वयंसेविकांना दरमहा 1000 हजार रुपये म्हणजेच प्रतिदिन 33 रुपये भत्ता देण्यात येतो. शहरी व ग्रामीण भागातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांचे काम समान असतानाही मोबदल्यात मात्र मोठा फरक आहे.

त्यामुळे ग्रामीण आशा स्वयंसेविका, गटप्रवर्तकांनाही प्रतिदिन 300 रुपये देण्यात यावे, तसेच या कर्मचार्‍यांचे काम अत्यावश्यक व नियमित स्वरूपाचे असल्यामुळे त्यांना शासकीय सेवेत कायम करावे. तोपर्यंत आशा स्वयंसेविकांना 18 हजार तर गटप्रवर्तकांना 22 हजार रुपये दरमहा वेतन देण्यात यावे आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या आहेत.

पंचायत समितीच्या सभापती सुनीता गोकुळ दौंड यांनी आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांच्या मागण्यांसंदर्भात पंचायत समितीमार्फत पाठपुरावा करून आपल्या प्रलंबित प्रश्नां बाबत न्याय मिळून देण्यास प्रयत्न करू. शिवसेनेचे तालुकाप्रमुख अंकुश चितळे, नगरसेवक बंडू बोरुडे, स्वाभिमानी मराठा महासंघाचे कृषिराज टकले यांनीही आंदोलकांची भेट घेतली.

यावेळी संघटनेच्या तालुकाध्यक्षा मनीषा डांभे, सविता शिंदे, नाजीया शेख, अलका रुपनार, मनीषा पालवे, कविता पाखरे, अनिता कांबळे, वनिता गर्जे, संगीत भताने, शिलप्रभा फुंदे, सुवर्ण मरकड, मारुती सावंत उपस्थित होते.

No stories found.
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com