शेवगावला आशा, गटप्रवर्तकांचा कामावर बहिष्कार, बेमुदत बंद

ऑनलाईन कामास विरोधासह विविध मागण्यांसाठी आंदोलन
शेवगावला आशा, गटप्रवर्तकांचा कामावर बहिष्कार, बेमुदत बंद

शेवगाव |तालुका प्रतिनिधी| Shevgav

शेवगाव येथे आज आशा व गटप्रवर्तकांचा ऑनलाईन काम करण्यास विरोध दर्शविण्यासह विविध मागण्यांसाठी कामावर बहिष्कार टाकत राज्यव्यापी बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले.

यावेळी भाकपचे राज्यसचीव कॉ.सुभाष लांडे, आयटकचे राज्य काउन्सिल सदस्य कॉ. संजय नांगरे, अंजली भुजबळ, अलका पाचे, आरती मोहीते, पावसे सुनीता, शिरीन शेख, काळे कल्पना, सुरेखा नेव्हल, संगीता रायकर, ज्योती ढोले, सुनेत्रा महाजन, अस्मिता माळी, प्रतिभा गरड, छाया दळवी, कॉ.भगवान गायकवाड, का. दत्तात्रय आरे, अक्षय खोमणे यांच्यासह मोठ्या संख्येने आशा कर्मचारी उपस्थित होत्या.

आंदोलकांनी विविध मागण्यांसंदर्भात पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व तालुका आरोग्यअधिकारी यांना निवेदने दिली आहेत. यामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्रात शहरी व ग्रामीण भागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांत 70 हजार आशा स्वयंसेविका व 4 हजार गटप्रवर्तक कार्यरत आहेत. आशा स्वयंसेविकांना कामावर आधारीत मोबदला मिळतो व गटप्रवर्तकांना दौर्‍यावर आधारीत प्रवास खर्च मिळतो. आशा स्वयंसेविकांना इंग्रजी सफाईदारपणे लिहिता व वाचता येत नाही. परंतु आरोग्य विभागाकडून आशा स्वयसेविकांना बहुतांश इंग्रजीत असलेल्या अ‍ॅपवर कामे ऑनलाईन करण्याची सक्ती केली जात आहे.

त्यामुळे आशा कर्मचारी यांना शासकीय कर्मचारी दर्जा द्यावा, किमान वेतन द्यावे, दिवाळी बोनस द्यावा, निवणुकीचे थकीत मानधन द्यावे या मागण्या करण्यात आल्या. तसेच अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोनशी (स्मार्टफोन) संबंधित ऑनलाईन कामे आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांना लावण्यात येत आहेत. त्याकरिता प्रत्येक आशांना युजर आयडी व पासवर्ड देण्यात येत आहेत. गटप्रवर्तकांना विना मोबदला ऑनलाईन डाटा एन्ट्री करण्याची कामे लावण्यात येऊ नयेत, ही सर्व कामे ऑनलाईन करण्यासाठी आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना (जितके दिवस ऑनलाईन कामे करावयाची आहेत. तितक्या दिवसांकरिता) सर्व कामांसाठी एकत्रित प्रतिदिन 500 रुपये मोबदला देण्यात यावा. या मागण्या पूर्ण हेात नाहीत तोपर्यंत आशा स्वंयसेविका व गटप्रवर्तकांना ऑनलाईन डाटा एन्ट्री करण्याची कामे सांगण्यात येऊ नयेत. याउपरही सदरील कामे सांगितल्यास त्यावर आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचा बहिष्कार राहील, असे म्हटले आहे.

ऑनलाईन कामात अडथळे फार

अ‍ॅपद्वारे तसेच डाटाएन्ट्रीची कामे करण्यासाठी अ‍ॅन्ड्रॉईड मोबाईल फोनची आवश्यकता आहे. असेे मोबाईल फोन आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांकडे उपलब्ध नाही. यासाठी आवश्यक डाटा पॅक दिलेला नाही. ऑनलाईन कामे करण्यासाठी त्यांना योग्य प्रशिक्षण दिलेले नाही. त्यामुळे त्यांना वरील ऑनलाईन कामे करणे शक्य होत नाही.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com