एकल कलाकारांची अर्थसहायासाठी फरफट !

तहसीलदार वा गटविकास अधिकारी स्वीकारेना प्रस्ताव
एकल कलाकारांची अर्थसहायासाठी फरफट !

अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar

एकल कलाकार अर्थसहाय्य योजने प्रस्ताव दाखल करण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज, तहसीलदारांकडील उत्पन्नाचा दाखला, आधार कार्ड, रहिवासी दाखला, कला क्षेत्रात 15 वर्ष कार्यरत असल्याचे पुरावे, शिधा पत्रिकेची सत्य प्रत यासह अन्य कागदपत्रांची आवश्यकता आहे. ही कागदपत्रे गोळा करून प्रस्ताव दाखल करण्यासाठी किमान 15 दिवसांचा कालावधी लागत असून त्यानंतर हे प्रस्ताव तहसीलदार यांच्याकडे नेले असता ते गटविकास अधिकार्‍यांकडे सादर करण्यास सांगतात, तर गटविकास अधिकारी तहसीलदार यांच्याकडे बोट दाखवत आहेत. यामुळे हे प्रस्ताव नेमके कोणाकडे दाखल करायचे अशा संभ्रम अवस्थेत जिल्ह्यातील लोककलावंत सापडला आहे.

दरम्यान, या योजनेसाठी प्रस्ताव सादर करण्यासाठी 15 मे पर्यंत मुदत वाढवून मिळावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे जिल्हा निवड समितीचे सदस्य भगवान राऊत, डॉ. श्याम शिंदे, रियाज पठाण, हमीद सय्यद, हसन शेख पाटेवाडीकर यांनी निवेदनाव्दारे केली आहे. एकल कलाकार यांना अर्थसहायक करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षते खाली समिती असून ते स्वत: या समितीचे अध्यक्ष आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी (जिल्हा परिषद), मनपा आयुक्त, जिल्हा माहिती अधिकारी, एनआयसीचे अधिकारी, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, तसेच कला क्षेत्राशी निगडित जिल्ह्यातील 10 कलाकार हे समितीचे सदस्य आहेत. मार्च 2020 ते डिसेंबर 2021 या कालावधीमध्ये ज्या एकल कलाकारांना करोना महामारी व लॉकडाऊनच्या संकटामुळे कला सादर करून उदरनिर्वाह करता आला नाही. त्यांना आर्थिक मदत करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

दुसरीकडे या मदत योजनेबाबत सर्व स्तरावरील कलावंतांना माहिती मिळणे आवश्यक होते. त्यासाठी गाव खेडे, तालुका, वाडी वस्ती, पाल, तालुका व जिल्हा पातळीवर दवंडी, ध्वनी क्षेपक, पॉम्पलेट, हँडबिलच्या माध्यमातून योजनेची माहिती, विहित नमुन्यातील अर्ज, अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे व प्रस्ताव कुठे सादर करायचा याबाबतची माहिती देणे आवश्यक होते. मात्र जानेवारी ते मार्च 2022 या 3 महिन्यांच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कोणतीही जनजागृती झाली नाही. यामुळे प्रत्यक्ष स्वरुपात योजनेची माहिती एकल कलावंतांनापर्यंत पोहचलीच नाही. तर दुसरीकडे जे अर्ज करत योजनेच्या लाभासाठी प्रयत्न करत आहे, त्याची देखील फरफट सुरू आहे.

एकट्या नगर जिल्ह्यात 1 हजार 500 हून अधिक एकल कलावंत आहेत. हे सर्व गरजू आहेत. त्यांच्यापर्यंत ही योजना पोहचली नाही. म्हणून त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. मुळात अनेक लोककलावंत अशिक्षित असतात. त्यांच्याकडे स्मार्ट फोन नसतो. तसेच ते वृत्तपत्र देखील वाचत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे ही योजना त्यांच्यापर्यंत पोहचली नाही. प्रशासकीय पातळीवर 26 मार्च रोजी जिल्हा वृत्तपत्रातून या बाबतचे वृत्त प्रसिद्ध करण्यात आले. 26, 27 मार्च रोजी शासकीय कार्यालयांना सुट्टी होती. आणि 31 मार्च पर्यंत प्रस्ताव दाखल करण्याची घाई करण्यात आली. जिल्हास्तरीय निवड समितीच्या सदस्यांना दाखल प्रस्तावाची पडताळणी करता आली नाही. ते सर्व प्रस्ताव अशासकीय सदस्यांपर्यंत आलेच नाहीत असे असताना ते प्रस्ताव मंजुरीसाठी पाठविण्याची घाई होत आहे.

logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com