गरजेनुसार कृत्रिम पावसासाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभी करा

भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समितीची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
गरजेनुसार कृत्रिम पावसासाठी कायमस्वरुपी यंत्रणा उभी करा

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

चीनप्रमाणे पावसाने ओढ दिल्यावर किंवा गरज भासेल तेव्हा पाऊस पाडता येईल, अशी कायमस्वरूपी यंत्रणा उभारावी, अशी मागणी भंडारदरा लाभक्षेत्र पाणी समिती व स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र राज्य हे भारतातील वाळवंटी प्रांतानंतर सर्वाधिक कमी पर्जन्यमान असलेले राज्य आहे. सर्वाधिक पाऊस पडणार्‍या ऑगस्ट महिन्यात पावसाने पूर्ण विश्रांती घेतली असून ही विश्रांती काळजी वाढवणारी आहे.

कारण दर तीन ते चार वर्षांनी महाराष्ट्र राज्यात दुष्काळी स्थिती उद्भवते. 2003-2004 मध्ये तत्कालीन कृषी मंत्री स्व.गोविंदराव आदिक व मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी वरील प्रयोग यशस्वीपणे राबवला होता. त्यावेळी त्याचे कंत्राट अमेरिकन कंपनीला क्लाऊड सिडींग तंत्रज्ञानाने पाऊस पाडण्यासाठी 4.5 कोटी रुपयाला दिले होते. साधारणपणे प्रत्येक तालुक्याचे शेती उत्पादन हे किमान 500 कोटी रुपयांचे असल्याने आपला देश जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश असल्याने शेती उत्पादनात घट आपल्याला परवडणारी नाही. हा प्रयोग केल्यावर आपण शेतकरी आत्महत्या ही काही प्रमाणात थांबवू शकतो.

तातडीने हा प्रयोग राबवल्यास उर्वरित पावसाळ्यात आपण धरणांमधील पाणीसाठा वाढवू शकतो, पशुधन वाचवू शकतो कदाचित यापेक्षा जास्त रक्कम आपण टँकरने पाणीपुरवठा करण्यासाठी खर्च करत असतो. या सर्व बाबींचा व संभाव्य दुष्काळाचा विचार करुन वरील निर्णय तातडीने राबवावा, अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनावर सुरेश ताके, जितेंद्र भोसले, भरत आसने, दत्तात्रय लिप्टे, किशोर पाटील, रवी वाबळे, राजेंद्र भांड, संदीप गवारे, दिलीप गलांडे, जगन्नाथ भोसले, ईश्वर दरंदले, नामदेव येवले, महेश लवांडे, विकास ढोकचौळे, बापुसाहेब सदाफळ आदींची नावे आहेत.

   
logo
Latest Marathi News, Marathi News Paper, Breaking News In Marathi, Marathi Batmya Live
www.deshdoot.com