कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भाजपचे उद्या राज्यव्यापी कंदील आंदोलन

कृत्रिम वीजटंचाईच्या विरोधात भाजपचे उद्या राज्यव्यापी कंदील आंदोलन

शिर्डी |शहर प्रतिनिधी| Shirdi

राज्यातील वीज टंचाईच्या विरोधात उद्या 24 एप्रिल रोजी भारतीय जनता पार्टीतर्फे राज्यव्यापी कंदिल आंदोलन करण्यात येणार आहे. भाजपा कार्यकर्ते शहरातील प्रमुख ठिकाणी राज्य सरकारच्या कारभाराच्या निषेधार्थ कंदील घेऊन उभे राहतील, अशी माहिती भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र गोंदकर यांनी दिली.

श्री. गोंदकर यांनी सांगितले की, राज्यातील सध्याच्या वीज टंचाईच्या समस्येला राज्य सरकारच जबाबदार असून राज्यात अघोषित भारनियमन सुरूच आहे. दीड तासांपासून सहा तासांपर्यंत वीज गायब असल्याने ग्राहक होरपळत असताना सुरक्षा अनामत रक्कम दुप्पट करून सरकारने ग्राहकाच्या खिशातून सुरू केलेली सक्तीची वसुली ताबडतोब थांबविण्याच्या मागणीसाठी भाजपतर्फे राज्यव्यापी आंदोलन पुकारण्यात येणार आहे.

देखभाल दुरुस्तीच्या नावाखाली वीजपुरवठा बंद ठेवून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेवर गदा आणणार्‍या ठाकरे सरकारच्या निषेधार्थ भाजपाचे हजारो कार्यकर्ते राज्यभर वीज मंडळाच्या कार्यालयावर धडक देतील. भारनियमन संपूर्ण मागे घेईपर्यंत हे आंदोलन सुरू राहील, अशी घोषणा जिल्हाध्यक्ष गोंदकर यांनी पत्रकाद्वारे केली.

गेल्या सुमारे तीन आठवड्यांपासून राज्यात विजेचा खेळखंडोबा सुरू आहे. सरकारी कार्यालयांची हजारो कोटींची थकबाकी, सामान्य ग्राहकाच्या थकबाकी वसुलीसाठी वीज कापण्याची कारवाई, ढिसाळ व्यवस्थापनामुळे निर्माण झालेली कोळशाची टंचाई, ऐन उन्हाळ्यात सक्तीने बंद ठेवलेली वीजनिर्मिती संयंत्रे अशा बेदरकार कारभारामुळे राज्याचे वीज व्यवस्थापन कोलमडले आहे. राज्यातील सुमारे 27 वीज निर्मिती संयंत्रे बंद किंवा जेमतेम चालवली जात आहेत. विजेची मागणी कमी असतानाच्या काळात करावयाची देखभाल दुरुस्तीची कामे ऐन उन्हाळ्यात हाती घेऊन सरकारने वीज टंचाईच्या समस्येत भर घातली आहे.

सरकारच्या बेशिस्तीमुळे वीज मंडळाचा कारभार ढासळला असून आर्थिक बेशिस्तीला आळा घालण्यासाठी एक अभ्यास गट नेमण्याची सूचना राज्य वीज नियामक आयोगाने सरकारला चार महिन्यांपूर्वी केली होती. अद्याप अशा अभ्यास गटाची नियुक्तीच झालेली नसल्याची माहिती मिळत असून वीज मंडळ मोडीत काढण्यासाठीच सरकार जाणीवपूर्वक प्रयत्न करत आहे असा आरोपही श्री. गोंदकर यांनी केला. देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील भाजपचे सरकार सत्तेवर असताना भारनियमनमुक्त असलेल्या महाराष्ट्रावर आघाडी सरकारने पुन्हा वीजटंचाई लादली, असे ते म्हणाले.

खासगी क्षेत्राकडून वीज खरेदीच्या दरावर केंद्र सरकारने मर्यादा घातल्याने राज्य सरकारमधील हितसंबंधीयांची कोंडी झाली असून टक्केवारीच्या राजकारणात अडथळे येत असल्याने त्यांचा जळफळाट सुरू आहे. त्यामुळेच कृत्रिम टंचाई निर्माण करून जनतेला वीज संकटात ढकलले जात आहे. सरकारी कार्यालयांची बिले थकविणारे व ग्राहकांची लुबाडणूक करणारे आघाडी सरकार हेच सर्वात मोठे वीजचोर असून तातडीने थकबाकीची रक्कम वीज मंडळास देऊन वाढीव सुरक्षा अनामत वसूल करण्याचा निर्णय ताबडतोब मागे घ्यावा अन्यथा विजेच्या प्रश्नावर महाराष्ट्रात मंत्र्यांना जागोजागी जाब विचारला जाईल, असा इशारा त्यांनी दिला.

Related Stories

No stories found.