
अहमदनगर (प्रतिनिधी)
सहा वर्षाच्या अल्पवयीन मुलीसोबत चाळे करणार्या व्यक्तीविरूध्द येथील तोफखाना पोलीस ठाण्यात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडित अल्पवयीन मुलीच्या आईने याप्रकरणी फिर्याद दिली आहे.
अभय निळकंठ सत्राळकर (रा. नरहरीनगर, गुलमोहोर रोड, सावेडी) असे गुन्हा दाखल झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला पोलिसांनी अटक केली आहे. शुक्रवारी (दिनांक 21 एप्रिल) सायंकाळी साडे आठ वाजता नगर शहरातील एका उपनगरात ही घटना घडली. शनिवारी (दिनांक 22 एप्रिल) गुन्हा दाखल झाला आहे.
फिर्यादी यांची अल्पवयीन मुलगी शुक्रवारी सायंकाळी सायकल खेळत असताना अभय सत्राळकर याने तिला थांबवले. तो काम करत असलेल्या मालकाच्या घरामधील नवीन फिश टँक दाखविण्याचा बहाणा करून मुलीला घरामध्ये नेले. तेथे त्याने मुलीसोबत चाळे केले. पीडित मुलगी घाबरल्याने तिने आरडाओरडा करण्यास सुरूवात केली.
त्यानंतर सत्राळकर याने तिला सोडून दिले. पीडित मुलगी सायकल घेवून तेथ घरी आली. तिने घडलेला प्रकार रडत-रडत तिच्या आईला सांगितला. त्यानंतर त्यांनी शनिवारी तोफखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी अभय सत्राळकरविरोधात विनयभंग, पोक्सो कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.