<p>अहमदनगर|Ahmedagar</p><p>चोरीचा मोबाईल विकत घेणार्या एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी कोपरगाव येथे अटक केली. </p>.<p>दिनेश दादासाहेब नेहे (वय- 21 रा. सवंत्सर ता. कोपरगाव) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. त्याच्याकडून चोरीचा मोबाईल पोलिसांनी जप्त केला आहे. तर मोबाईल चोरी करणारा शुभम शायरी चव्हाण (रा. शिंगणापूर रेल्वे स्टेशन ता. कोपरगाव) हा पसार झाला आहे.</p><p>29 ऑक्टोबर रोजी मच्छिंद्र साहेबराव जाधव (रा. वाघापूर ता. संगमनेर) यांचा 10 हजार रूपये किंमतीचा मोबाईल शिर्डी येथून चोरीला गेला होता. याप्रकरणी त्यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. या गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा करीत असताना पोलीस निरीक्षक अनिल कटके यांना माहिती मिळाली की, जाधव यांचा चोरीचा मोबाईल दिनेश नेहे याच्याकडे आहे. निरीक्षक कटके यांनी नेहे याला अटक करण्याच्या सुचना केल्या. पोलीस हवालदार विजयकुमार वेठेकर, उमाकांत गावडे, पोलीस नाईक शंकर चौधरी, रवी सोनटक्के, सचिन आडबल, संतोष लोढे, दीपक शिंदे, पोलीस शिपाई रोहित यमुल यांच्या पथकाने सवंत्सर येथे जाऊन दिनेश नेहे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे चौकशी केली असता त्याने सांगितले की, सदरचा मोबाईल शुभम चव्हाण याच्याकडून विकत घेतला आहे. चोरीचा मोबाईल विकत घेतल्याने पोलिसांनी दिनेश नेहे याला अटक करून शिर्डी पोलिसांच्या ताब्यात दिले.</p>